"चले जाव'वरून सरकार-विरोधकांत जुंपली

"चले जाव'वरून सरकार-विरोधकांत जुंपली

मुंबई - "चले जाव‘ आंदोलन दिन साजरा करण्यावरून सरकार आणि विरोधक यांच्यात जुंपली आहे. सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही संकल्प केले आहेत, तर तो धागा पकडत कॉंग्रेसने सरकारवर टीका केली आहे. 


""देशाचे सरासरी वयोमान 2020 मध्ये 29 वर्षे असेल. तरुण मनुष्यबळ ही देशाची संपत्ती असून, येत्या काळात हा तरुणांचा देश संपूर्ण जगाचा मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे देशाला प्रगतिपथाकडे नेण्यासाठी, तसेच दारिद्य्र व भ्रष्टाचार निर्मूलनासाठी सर्वांनी मतभेद दूर ठेवत एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे,‘‘ असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज येथे केले. 


ऑगस्ट क्रांती दिन आणि चले जाव चळवळीच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या प्रारंभानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजिलेल्या "चले जाव चळवळ 2‘ या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या वेळी केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकासमंत्री एम. वेंकय्या नायडू, शालेय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, आमदार आशिष शेलार, योगेश सागर, मंगलप्रभात लोढा, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक शैलेश जाधव आदी उपस्थित होते. 


""ऑगस्ट क्रांती मैदानाचा इतिहास प्रेरणादायी आहे. याच ऐतिहासिक मैदानात आपण सर्व समाजातील निरक्षरता, व्यसनाधीनता, भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी सज्ज झालो आहोत. या लढ्यासाठी आजचा हा कार्यक्रम लोकांमध्ये चेतना निर्माण करणारा ठरला आहे,‘‘ असे केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी या वेळी सांगितले.
 

"सिक्वेल‘ काढायला हा चित्रपट आहे का?
प्रदेश कॉंग्रेसची संतप्त विचारणा

"चले जाव चळवळ 2‘च्या नावाखाली ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त केलेल्या कार्यक्रमावर संतप्त टीका करताना "सिक्वेल काढायला या आंदोलनाला चित्रपट समजता का?‘ अशी विचारणा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्य सरकारला केली आहे. 


या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना सावंत यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले की, केवळ 1942चे
चले जाव आंदोलनच नव्हे तर भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला आणि स्वातंत्र्यांनतर देशाचा तिरंगा व घटनेला विरोध करणाऱ्या विचारधारेकडून आज पुन्हा स्वातंत्र्यलढ्याचा, तसेच स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान झाला आहे. गोळवलकर गुरुजींच्या संघाने "चले जाव‘ चळवळीचा विरोध केला होता, हा इतिहास आहे. एवढेच काय तर देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यास इच्छुक असलेल्या अनेकांना रोखण्याचे पातकही त्यांनी केले. महात्मा गांधींनी इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी दिलेल्या "चले जाव‘च्या हाकेला विरोध करणारे आता 74 वर्षांनंतर "चले जाव‘ला नवे रूप देऊन मूळ आंदोलनाचे महत्त्व कमी करू पाहत आहेत. हे एक कारस्थान असल्याची शक्‍यता नाकारता येत नाही, असाही संशयही सावंत यांनी व्यक्त केला
 

स्वातंत्र्यलढ्याशी संबंध नसणाऱ्यांना देशप्रेमाचे भरते
राष्ट्रवादी कॉंग्रेसची टीका

स्वातंत्र्यलढ्याशी काडीचाही संबंध नसणाऱ्यांनाच आता देशप्रेमाचे भरते येत असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी केली. क्रांती दिनानिमित्त मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते. आज ऑगस्ट क्रांतिदिनी "भारत छोडो‘ आंदोलनातील हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी मुंबई विभागीय राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने मुंबई सेंट्रल ते ऑगस्ट क्रांती मैदान येथे "मूक मोर्चा‘ काढण्यात आला. या मोर्चाचे नंतर सभेत रूपांतर झाले.
 

""स्वातंत्र्यलढ्यात कधीच सहभाग नसणारे आता देशप्रेम आणि स्वातंत्र्यलढ्याबाबत बोलत आहेत, याचा अचंबा वाटतो. ऑगस्ट क्रांती मैदानात यापूर्वी हे लोक कधीच दिसत नव्हते. आज त्यांचे मंडप या ठिकाणी लागले आहेत,‘‘ अशी टीका भाजपचे नाव न घेता पाटील यांनी केली. ""सरकारी खर्च करून ऑगस्ट क्रांती मैदानात हुतात्म्यांना अभिवादन करत आहेत, त्यापेक्षा मोकळ्या मनाने आले असते तर त्यांचे आम्ही स्वागत केले असते,‘‘ अशी टिप्पणीही त्यांनी केली. स्वातंत्र्यलढ्यात कोणी त्याग केला, कोणी बलिदान केले, कुणी संघर्ष केला, महात्मा गांधींबाबतची या पक्षाची भूमिका काय? याची विचारणा केल्यास या प्रश्नांची सर्व उत्तरे नकारात्मकच येतील.
 

या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही भाजपचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. आता ऑगस्ट क्रांती दिन साजरा करणाऱ्यांना उशिरा शहाणपण सुचलेले आहे, असा टोला त्यांनी भाजपचे नाव न घेता लगावला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com