ओशोंच्या मृत्युपत्राची प्रत बनावट

osho-rajneesh
osho-rajneesh

मुंबई - अध्यात्मिक गुरू ओशो रजनीश यांच्या मृत्युपत्राची प्रत जगात कुठेही उपलब्ध नाही, तसेच भारतातील प्रतही बनावट असल्याची माहिती पुणे आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) उच्च न्यायालयात दिली. या प्रतीबाबत दिल्ली फॉरेन्सिक लॅबने दिलेला अहवाल या विभागाने न्यायालयात सादर केला.

ओशो रजनीश यांचे खोटे मृत्युपत्र बनवून ट्रस्टने कोट्यवधींची अफरातफर केल्याचा आरोप ओशोंचे निकटवर्तीय योगेश ठक्कर यांनी याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केला आहे. याबाबत ठक्कर यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतरही चार वर्षे तपास पुढे सरकला नाही. त्यामुळे त्यांनी ही याचिका केली. न्यायालयाच्या आदेशानंतर हा तपास पुणे ईओडब्ल्यू करत आहे.

मागील सुनावणीत आतापर्यंतच्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. भारतात रजनीश यांच्या मृत्युपत्राची झेरॉक्‍स आहे. मूळ प्रत स्पेनच्या कोर्टात असल्याचे मानले जात होते. येथील झेरॉक्‍स प्रतीवरून रजनीश यांची सही खरी की खोटी आहे याची पडताळणी करणे अशक्‍य आहे, असे अहवालात नमूद केल्याची माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली.

भारतीय तपासयंत्रणा परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने स्पेनच्या कोर्टातून मूळ प्रत मिळविण्यासाठी प्रयत्नशील होत्या; पण त्यांनीही मूळ प्रत नसल्याचे सांगितल्याने पुढील कार्यवाही थांबवली, असे ईओडब्ल्यूने न्यायालयात सांगितले. 1 ऑगस्टपर्यंत या तपासाचा प्रगती अहवाल सादर करा, असे सांगत न्यायालयाने सुनावणी तहकूब केली.

न्यायालयाची नाराजी
पुणे आर्थिक गुन्हे शाखेने सादर केलेल्या तपास अहवालावर न्या. आर. एम. सावंत आणि न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. एखादी कंपनी सादर करते तसा वार्षिक अहवाल नको; तर आतापर्यंत काय तपास केला याची माहिती स्टेटस रिपोर्टमध्ये अपेक्षित होती असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com