पालघर : माकुणसार मधील भूखंड घोटाळा, जबाब, पंचनामे खोटे - ग्रामस्थ

प्रमोद पाटील
गुरुवार, 12 एप्रिल 2018

सफाळे : पालघर जिल्हयातील माकूणसार येथील सर्वे नं.180 ही गावाच्या वहिवाटी खालील पावणे आठ एकर जमीन पालघर येथील सुनील दुबे नामक इसमाने पीक पाहणीच्या नोंदीच्या आधारे काही दिवसांपूर्वी बळकावली, या  प्रकरणात आता नवीन माहिती उजेडात आली आहे, ग्रामस्थांनी केलेल्या माहितीच्या अधिकारात या संदर्भातील महत्वाची माहिती मिळाली आहे.

सफाळे : पालघर जिल्हयातील माकूणसार येथील सर्वे नं.180 ही गावाच्या वहिवाटी खालील पावणे आठ एकर जमीन पालघर येथील सुनील दुबे नामक इसमाने पीक पाहणीच्या नोंदीच्या आधारे काही दिवसांपूर्वी बळकावली, या  प्रकरणात आता नवीन माहिती उजेडात आली आहे, ग्रामस्थांनी केलेल्या माहितीच्या अधिकारात या संदर्भातील महत्वाची माहिती मिळाली आहे.

सुनिल दुबे या इसमाने पीक-पाहणी नोंद करण्यासाठी अर्ज केल्या नंतर तत्कालीन तलाठी रत्नदीप दळवी यांनी पीक-पाहणी साठी करण्यात आलेल्या स्थळ पाहणीची कोणतीही माहिती सरपंच, उपसरपंच आणि गावातील पंच यांना कळवली नाही. संपूर्ण गावाला अंधारात ठेवून या भूखंडावरील पीक पाहणी चा पंचनामा करण्यात आला त्यामुळे या जमिनीच्या अफरातफरीची ग्रामस्थांना खबर लागली नाही.

असे असताना उपलेखपाल, कुळ वहिवाट शाखा, पालघर यांनी मात्र सरपंच आणि पोलीस पाटील यांना कळवण्यात आल्याची खोटी माहिती आदेश देताना नमूद केली, या विरुद्ध सरपंच आणि सदस्यांनी उपविभागीय अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

तसेच तत्कालीन तलाठी यांनी पंचनामा करताना पंच म्हणून गावाचे रहिवासी नसलेल्या, गावाबाहेरील व्यक्तींचे खोटे जबाब घेऊन त्यांच्या सह्या घेतल्या त्याच प्रमाणे सदरहू जमिनीवर भात पीक घेण्यात आल्याचे पंचनाम्यात म्हटले परंतु ही संपूर्ण जमीन खारटण असल्याने येथे भातपिक होणे शक्य नाही तरीसुद्धा या संदर्भातील खोटा पंचनामा बनवण्यात आला.

या सर्व खोट्या आणि निराधार जबाब-पंचनाम्याच्या आधारे सदरहू जमिनीवर पीक पाहणी ची नोंद मान्य करण्याचे आदेश देण्यात आले, त्यामुळे खोट्या जबाब - पंचनाम्याच्या आधार घेऊन करण्यात आलेली पीक पाहणीची नोंद तत्काळ रद्द करावी आणि शासनाची फसवणूक करणाऱ्या या सर्व व्यक्तींवर आणि संगनमत करून भूखंड बळकावण्यास मदत करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

"सदर बाबतीत येत्या 19 एप्रिलला सुनावणी लावण्यात आली आहे. या सुनावणी नंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे उपविभागीय अधिकारी विकास गजरे यांनी सांगितले. 

"माकुणसार येथील माझ्या वीस एकर जागे लगतची  पावणे आठ एकर जागा मी दांडेकर यांच्या कडून विकत घेतली असून सदर जागेचा सातबारा वारसा करिता तलाठी कार्यालयात दिला आहे. या जागे संदर्भात कुणाची तक्रार असल्यास मालकाने गेल्या बारा मार्च रोजी पेपर नोटीस दिली आहे., असे सुनिल दुबे यांनी सांगितले.  

Web Title: palghar mankusar land fraud