पालघर: अंनिस पालघरतर्फे 'जवाब दो' आंदोलन

प्रमोद पाटील
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

पुरोगामी विचारधारा असलेल्या महाराष्ट्रात प्रबोधन करणाऱ्या विचारवंतांचे खून होणे ही लाजिरवाणी घटना असल्याचे मत निलेश राऊत, प्रकाश लवेकर व पालघर जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अॅड दिपक भाते यांनी सांगितले. 

सफाळे : डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 4 वर्षे, तर कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला 29 महिने होऊनही सीबीआयपासून सर्व तपास यंत्रणा ही खुनी आरोपी व या घटनेचा सूत्रधार शोधण्यात अपयशी ठरल्या आहेत नव्हे सुस्त आहेत. सरकार व तपास यंत्रणा यांनी दाखवलेला निरूत्साह  व नंतर कर्नाटक येथील पुरोगामी विचारवंत प्रा. एम एम. कलबुर्गी यांचीही हत्या याच पद्धतीने झाली. या तिन्ही हत्याकांडाचा सूत्रधार व मारेकरी मोकाट का? असा सवाल विचारत जवाब दो ही मागणी करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पालघर जिल्हा, राष्ट्र सेवादल,भुमी सेना,तसेच सर्व पुरोगामी संघटनांनी शुक्रवारी  दुपारी 3 ते 4.30 वाजता पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

पुरोगामी विचारधारा असलेल्या महाराष्ट्रात प्रबोधन करणाऱ्या विचारवंतांचे खून होणे ही लाजिरवाणी घटना असल्याचे मत निलेश राऊत, प्रकाश लवेकर व पालघर जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अॅड दिपक भाते यांनी सांगितले. 

सेवादलाचे विद्याधर ठाकूर, ज्येष्ठ अंनिस कार्यकर्ते वसंतराव करवीर, पालघर अंनिसचे अध्यक्ष अॅड सुरेश महाडीक, उपाध्यक्ष रंगराव गढरी यांच्यासह अंनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

तिन्ही हत्यांमधील संशयित मारेकरी सारंग अकोलकर  व विनय पवार या फरार आरोपींची रेखाचित्र सर्वत्र वाटण्यात आली. या हत्याकांडातील संशयितांचा संबंध सनातन संस्थेशी असल्याने  यासंबंधी त्या संस्थेची चौकशी व्हावी  व 2011 साली या संस्थेवरील बंदीचा प्रस्ताव  अदयापही कारवाई विना पडून आहे. या सर्व विषयांचा जवाब मागण्या साठी हा मोर्चा काढून  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पालघर जिल्ह्याच्यावतीने जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.