मोखाड्यातून तीन किलो वजनाच्या महादेवाच्या मुर्तीची चोरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

मोखाड्यात मोघी विहिरीजवळ सुमारे 85 वर्षे पुरातन महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराचा जिर्णोध्दार 1972 मध्ये करण्यात आला होता. त्यावेळी श्री गणेश, विष्णू, पार्वती, सुर्यनारायण आणि साईबाबाच्या मार्बलच्या मूर्त्या बसविण्यात आल्या होत्या. तर तीन वर्षापुर्वी संकल्प मित्र मंडळाने तीन किलो वजनाच्या महादेवाच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा केली होती.

मोखाडा : मोखाड्यात मोघी विहिरीजवळ असलेल्या पुरातन मंदिरातून सुमारे तीन किलो वजनाच्या महादेवाच्या मुर्तीची चोरी झाली आहे. तर चोरटय़ांनी मंदिरातील मार्बलच्या सुर्यनारायण आणि साईबाबाच्या मुर्तींची तोडफोड करून विटंबना केली आहे. त्यामुळे मोखाड्यात खळबळ उडाली असून काही काळ तणाव निर्माण झाला होता. या घटनेविषयी मोखाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मोखाड्यात मोघी विहिरीजवळ सुमारे 85 वर्षे पुरातन महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराचा जिर्णोध्दार 1972 मध्ये करण्यात आला होता. त्यावेळी श्री गणेश, विष्णू, पार्वती, सुर्यनारायण आणि साईबाबाच्या मार्बलच्या मूर्त्या बसविण्यात आल्या होत्या. तर तीन वर्षापुर्वी संकल्प मित्र मंडळाने तीन किलो वजनाच्या महादेवाच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा केली होती. भाविक येथे रोज पूजा, अभिषेक करण्यासाठी येतात. तर प्रतिवर्षी याच मुर्तीची शिवरात्रीला पालखी काढली जात होती. शनिवार 11  तारखेला काही अज्ञात समाजकंटक चोरट्यांनी सुमारे तीन किलो वजनाची महादेवाची मुर्ती चोरून नेली आहे. तर मार्बलच्या सूर्यनारायण आणि साईबाबांच्या पुरातन मुर्तीची तोडफोड करून विटंबना केली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी भाविक मंदिरात पुजा, अभिषेक करण्यासाठी आले असता ही घटना ऊघडकीस आली आहे. 

सदरची घटना समजताच गावकरी मंदिरात जमा झाले होते. यावेळी काही काळ तणाव ही निर्माण झाला होता. मोखाडा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. या प्रकरणी मोखाड्यातील विलास पाटील व दिलीप मोहोंडकर यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी मोखाडा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, दोन वर्षात मोखाड्यातील पुरातन हनुमान मुर्ती ची दोन वेळा मुर्ती वर कुर्‍हाडीचे घाव घालून मुर्ती तोडण्याचा प्रयत्न काही अज्ञात समाजकंटकांनी केला होता. त्यानंतर आता ही घटना घडल्याने मोखाड्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. 

या घटनेच्या तपासासाठी तातडीने एका पोलीस  पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश सोनवणे यांनी दिली आहे.