पालघरमध्ये हुतात्मादिनी जिल्हा परिषदेची निवडणूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

पालघर - स्वातंत्र्य लढ्यात हौतात्म्य पत्करणाऱ्या पालघर तालुक्‍यातील पाच स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची आठवण म्हणून 14 ऑगस्टला पालघरमध्ये हुतात्मा दिन पाळला जातो. या दिनानिमित्ताने पालघरमध्ये दुपारी आदरांजली वाहिली जाते; मात्र याच दिवशी जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि समितीच्या सभापतींची निवडणूक जाहीर केल्यामुळे राजकीय नेत्यांची पंचाईत झाली आहे.

पालघर येथे 14 ऑगस्ट 1942 रोजी "चले जाव' चळवळीत सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांनी इंग्रजांविरुद्ध मोर्चा काढल्यावर पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यात काशीनाथ हरी पागधरे, गोविंद गणेश ठाकूर, रामचंद्र भीमाशंकर तेवारी, सुकुर गोविंद मोरे, रामचंद्र महादेव चुरी यांनी हौतात्म्य पत्करले होते. त्यांच्या स्मरणार्थ 1944 पासून पालघर येथे उभारलेल्या हुतात्मा स्तंभाजवळ दुपारी 12 वाजून 39 मिनिटांनी श्रद्धांजली वाहिली जाते. या दिवशी पालघर शहरामध्ये उत्स्फूर्तपणे बंद पाळला जातो.

याच दिवशी जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे आयोजन केले आहे. या प्रक्रियेत दुपारी 1 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचा आहे. त्यामुळे हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू इच्छिणाऱ्या राजकीय मंडळींची पंचाईत होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक 16 ऑगस्टला घेण्याची मागणी राजकीय पक्षांकडून होत आहे.