प्रश्नपत्रिका फोडून 48 जण लष्करी सेवेत

प्रश्नपत्रिका फोडून 48 जण लष्करी सेवेत

ठाणे - लष्कराच्या मार्च 2016 मध्ये भंडारा येथे झालेल्या भरतीप्रक्रियेच्या लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फोडून त्या आधारे फलटणच्या राजा छत्रपती ऍकॅडमी प्रशिक्षण संस्थेतील 50 पैकी 48 उमेदवारांची लष्करी सेवेत भरती झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. या प्रश्नपत्रिकांच्या बदल्यात प्रत्येक उमेदवाराकडून एक लाख रुपयांची अशी सुमारे 50 लाखांची बिदागी या प्रशिक्षण संस्थेने स्वीकारल्याची बाब पोलिस तपासात समोर आली आहे.

पोलिसांनी याबद्दलची माहिती लष्कराच्या आर्मी रिक्रुटमेंट ऍथॉरिटीकडे सादर केली असून, त्यांच्याकडून कारवाई होण्याची शक्‍यता व्यक्त केली आहे. फलटणच्या राजा छत्रपती प्रशिक्षण संस्थेने हा गैरप्रकार केला असून, संतोष शिंदे हा संचालक आहे. रणजित जाधव हा सीमा सुरक्षा दलातील जवान या संस्थेशी संलग्न असल्याची माहिती ठाण्याचे पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी दिली. त्यामुळे लष्कराच्या प्रश्नपत्रिका फोडण्याच्या यापूर्वीच्या घटना समोर येण्याची शक्‍यता निर्माण झाली असून, याविषयीचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने लष्कराच्या प्रश्नपत्रिका फुटीचा प्रकार उघड केला असून, या प्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सीबीआय आणि लष्कराकडूनही ठाणे पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आहे. या संदर्भातील संपूर्ण माहिती ठाणे पोलिसांनी आर्मी रिक्रुटमेंट ऍथॉरिटीकडे सादर केली असून, त्यांच्याकडून कारवाईस सुरवात झाली आहे, तर नागपूर येथे या प्रकरणात लष्कराच्या मुख्यालयातील क्‍लार्क पदावर कार्यरत असलेले अटक आरोपी रवींद्र कुमार, धरम सिंग आणि निगमकुमार पांडे या आरोपींचे ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे हस्तांतर करण्याचा निर्णय लष्कराने घेतला आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांचे पथक या आरोपींना ठाण्यात आणण्यासाठी नागपूरला रवाना झाले आहे, अशी माहिती परमबीरसिंग यांनी दिली.

अशी फुटली प्रश्नपत्रिका...
नागालॅंडमध्ये आसाम रायफल्समध्ये हवालदार पदावर कार्यरत धकलू पाटील यांच्याकडे आर्मी रिक्रुटमेंट ऍथॉरिटीकडून प्रश्नपत्रिका असलेली सीडी छपाईसाठी देण्यात आली होती. त्या सीडीतून प्रश्नपत्रिका काढून व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून ती नागपूर येथील क्‍लार्क पदावर कार्यरत रवींद्र कुमार, धरम सिंग आणि निगमकुमार पांडे यांच्याकडे आली आणि त्यानंतर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रशिक्षण केंद्रांवर ती अत्यंत कमी वेळात पाठविण्यात आली. या पद्धतीने या मंडळींनी यापूर्वीही अशा प्रश्नपत्रिका फोडल्या असल्याचे दिसून येत असून, मार्च 2016 मध्ये झालेल्या परीक्षेतही याच पद्धतीने प्रश्नपत्रिका फोडून ती उमेदवारांना एक लाख रुपयांमध्ये विकण्यात आली. सुमारे 50 लाख रुपये त्या वेळी त्यांना मिळाले होते, तर आता एक कोटी 35 लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले होते. या प्रकरणामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग अद्यापपर्यंतच्या तपासात दिसून आलेला नाही, असेही परमबीरसिंग यांनी सांगितले.

भरतीप्रक्रियेनंतर नेटवर्क तयार...
भंडारा येथील भरतीप्रक्रियेदरम्यान आलेल्या उमेदवारांना रवींद्र कुमार याने समोर येऊन प्रश्नपत्रिका देण्याचे स्पष्ट केले होते. उमेदवारांच्या माध्यमातून फलटणमधील राजा छत्रपती ऍकॅडमीचा संचालक संतोष शिंदे याने रवींद्र कुमार यांच्याशी संपर्क करून यात सहभाग नोंदवला. त्यानंतर संतोष शिंदेने अन्य 17 प्रशिक्षण संस्थांशी संधान बांधून या प्रश्नपत्रिकांची विक्री सुरू करून नेटवर्क तयार केले. या प्रकरणातील सर्व आरोपींना ठाण्यात आणून तपास केला जाणार आहे, अशी माहिती परमबीरसिंग यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com