पार्किंग सर्वेक्षण आजपासून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

नवी मुंबई - ३५ चौरस मीटर आकारापर्यंतच्या सदनिकेमागे एक चारचाकी वाहनाचे पार्किंग उच्च न्यायालयाने अनिवार्य केल्यामुळे शहरातील वाहनतळांच्या आवश्‍यकतेच्या चाचपणीसाठी महापालिकेने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई आयआयटीमार्फत उद्यापासून (ता. ५) पार्किंगचे सर्वेक्षण सुरू केले जाणार आहे. ते २० तारखेपर्यंत सुरू राहील. सध्या वापरात असणारी वाहने व वाहनांच्या वाढत्या मागणीबाबत नागरिकांना काही प्रश्‍नांची उत्तरे यात द्यावी लागणार आहेत. याशिवाय शहरात वाहनांच्या जागेची उपलब्धताही विचारात घेतली जाणार आहे.

महापालिकेने २०१० मध्ये शहरात केलेल्या सर्वेक्षणात वाहनतळाची निकड प्रशासनाच्या लक्षात आली होती; परंतु प्रत्येक घरासाठी वाहनतळ अनिवार्य केल्यास काही विकसकांच्या फायद्यावर कात्री लागण्याची शक्‍यता असल्याने पालिकेने वाहनधोरणाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे २०११ मध्ये सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी वाढत्या वाहतूक कोंडीच्या प्रश्‍नाबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने महापालिकेविरोधात निर्णय देत २०११ पासून अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते; मात्र महापालिकेकडून न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने तत्कालिन आयुक्त तुकाराम मुंढे यांना २०१६ मध्ये न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावली असून, कारवाई का करू नये, असा सवाल न्यायालयाने विचारला होता. प्रशासनाने २०१६ पासून ३५ चौरस मीटर आकारापर्यंतच्या एका घरामागे एक चारचाकी वाहनतळाची सोय केली असणाऱ्या विकसकांनाच बांधकाम परवानग्या देण्यात सुरुवात केली आहे.

महापालिकेने सर्वेक्षणासाठी आयआयटी मुंबईची निवड केल्यामुळे हे काम प्रामाणिकपणे होणे अपेक्षित आहे. नवी मुंबईकरांना त्यांच्या वाहनांबाबत जागा कुठे व कशी उपलब्ध होते? याची माहिती त्यांना द्यायची आहे. शहरात भविष्यात किती घरांमागे वाहनखरेदी झाल्यास त्यांना पर्यायी जागा याचा अंदाज सर्वेक्षणात घेणे गरजेचे आहे.
- संदीप ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते 

लहान घरांना वाहनतळ लागू केल्यामुळे जागेअभावी विकसकांसह नागरिकांनाही अडचण होत आहे. सध्या करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणात प्रत्येक नोडमध्ये आठ हजार घरे, सोसायटी, गावठाण व झोपडपट्टीचा भाग विचारात घेतला जाणार आहे. 
- डॉ. एन. रामास्वामी, आयुक्त

घरामागे एक पार्किंग अनिवार्य केल्यामुळे नागरिकांना वाहनखरेदीला प्रोत्साहन दिल्यासारखे होईल. पार्किंगसाठी जागा मिळाल्यावर वाहनांची संख्या वाढून वाहतूक कोंडीत भर पडेल. यापेक्षा सार्वजनिक वाहतुकीवर अधिक भर देण्याची गरज आहे. यामुळे प्रदूषणही कमी होण्यास मदत होईल.
- किशोर पाटकर, नगरसेवक

Web Title: Parking survey today navi mumbai