ऊर्जित पटेल यांच्यापुढे संतुलन साधण्याचे आव्हान

पीटीआय
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016

मुंबई - रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरपदाची सूत्रे ऊर्जित पटेल यांनी स्वीकारली आहेत. महागाई आणि विकास यांच्यातील संतुलन साधण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. 

मुंबई - रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरपदाची सूत्रे ऊर्जित पटेल यांनी स्वीकारली आहेत. महागाई आणि विकास यांच्यातील संतुलन साधण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. 

जानेवारी 2013 पासून पटेल डेप्युटी गव्हर्नर म्हणून काम करत आहेत. 11 जानेवारी 2016 रोजी त्यांची या पदावर फेर नेमणूक झाली. आता त्यांनी रघुराम राजन यांनी जागा घेतली आहे. पतधोरण समितीबरोबर (एमपीसी) काम करणे ही गोष्ट त्यांना सवयीची करून घ्यावी लागणार आहे. ""या समितीबरोबर काम करणे आणि त्याच वेळी महागाईसंदर्भातील उद्दिष्टे गाठणे या गोष्टींकडे ऊर्जित पटेल यांना लक्ष द्यावे लागेल,‘‘ असे सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च या संस्थेतील वरिष्ठ अभ्यासक राजीवकुमार यांनी सांगितले. सध्या अन्नधान्य चलनवाढीचा दर वाढत आहे. त्याच्यावर नियंत्रण कसे ठेवावे हे त्यांना बघावे लागणार आहे. तसेच गेले काही दिवस रिझर्व्ह बॅंक आणि अर्थ मंत्रालय यांच्यातील कथित संघर्षाबाबत सुरू असलेल्या चर्चा बंद कशा होतील, हेही पटेल यांना बघावे लागणार आहे, असे राजीवकुमार यांनी नमूद केले.
 

पटेल यांनी यापूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीबरोबर (आयएमएफ) काम केले आहे. 1996-97 मध्ये त्यांनी आयएमएफचे प्रतिनिधी म्हणून रिझर्व्ह बॅंकेत काम केले आहे. अर्थ मंत्रालयामध्ये 1998 ते 2001 या काळात त्यांनी सल्लागार म्हणून काम पाहिले. रिलायन्स इंडस्ट्रीज, आयडीएफसी, एमसीएक्‍स आणि गुजरात स्टेट पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्येही त्यांनी काम केले आहे. विविध केंद्र सरकारे आणि राज्य सरकारांबरोबर काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. पतधोरण, सार्वजनिक निधी, आंतरराष्ट्रीय व्यापार, नियंत्रक अर्थव्यवस्था आदी विविध विषयांवर त्यांचे विचार प्रकाशित झाले आहेत. ते येल विद्यापाठातून पीएचडी असून, ऑक्‍सफर्ड विद्यापीठातून एम.फिल. आहेत.