केईएममध्ये रुग्णांचे हाल सुरूच

केईएममध्ये रुग्णांचे हाल सुरूच

बाह्यरुग्ण विभागासमोर शेकडो रुग्णांची गर्दी
वडाळा - डॉक्‍टरांच्या आंदोलनामुळे परळमधील केईएम रुग्णालयात गरीब रुग्णांचे हाल मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. पुणे, जळगाव, सांगली, सातारा, रत्नागिरी आदी भागांतून आलेले शेकडो रुग्ण व त्यांचे कुटुंबीय चिंताग्रस्त अवस्थेत येथे बसले होते.

"बाह्यरुग्ण विभाग पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहील. फक्त अत्यावश्‍यक रुग्णांची तपासणी सुरू आहे,' असा फलक तिथे आहे. अशिक्षित रुग्णांना फलक वाचता येत नसल्याने त्यांचा चांगलाच गोंधळ उडाला आहे. रुग्णालय कधी सुरू होणार, याची योग्य माहिती न मिळाल्याने रुग्णांमध्ये नाराजी होती; पण येथेच उपचार घ्यायचे असल्याने शांत राहण्यावाचून पर्याय नाही, अशा अवस्थेत त्यांनी तिथे ठाण मांडले आहे. मंगळवार हा बाह्यरुग्ण विभागाचा असल्याने अनेक गर्भवती नियमित तपासणीसाठी आल्या होत्या. त्यांचीही चांगलीच फरपट झाली.

माझ्या मुलाच्या किडनीला सूज आली असल्याने पुण्याहून पहाटेच येथे आलो; पण "ओपीडी' बंद असल्याने सकाळपासून इथेच थांबलो आहोत. उपस्थित असलेले डॉक्‍टर संपाचे कारण पुढे करत हेलपाटे मारण्यास लावत आहेत. उपचार मिळाले नाहीत तर त्याची प्रकृती अधिक बिघडेल.
- जगदीश भोसले, पुणे

आठवा महिना असल्याने आज तपासणीसाठी सकाळपासून आले आहे; पण काय गोंधळ आहे कळत नाही. कुणी सांगते इकडे जा, कुणी सांगते तमुक वॉर्डला जा. काहीच समजत नाही. रुग्णालयात डॉक्‍टरही दिसत नाहीत.
- प्रज्ञा कांबळी, शिवडी

माझा भाचा सुभाष खामकर याला कॅन्सर झाला आहे. आम्ही रत्नागिरीहून त्याला सकाळी घेऊन आलो. इथे आल्यावर डॉक्‍टरांचा संप असल्याचे समजल्यामुळे आता काय करायचे कळत नाही. कुणी हौस म्हणून डॉक्‍टरला मारहाण करत नाहीत. येथे येणारे रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक गुंड नसतात. उलट काही डॉक्‍टरच रुग्णांशी उर्मटपणे बोलतात.
- नम्रता पवार, रत्नागिरी

माझ्या मुलीला उपचारांसाठी येथे सोमवारी घेऊन आलो आहोत. काय आजार आहे समजत नाही. ओपीडी सुरू होईपर्यंत कोणतीही तपासणी होणार नाही, असे इथले लोक सांगत आहेत. त्यामुळे सोमवारपासून दिवसभर ओपीडीजवळ थांबलो आहोत. खासगी रुग्णालयात घेऊन जाणे मला परवडणार नाही.
- वसंत माने, सातारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com