पेव्हर ब्लॉक ठरताहेत तकलादू!

Paver-Block
Paver-Block

मुंबई - पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवर पडलेले खड्डे रुंद आणि खोल झाले आहेत. या खड्ड्यांतून मार्ग काढताना चालकांची दमछाक होत आहे. अपघात टाळण्यासाठी खड्ड्यांच्या ठिकाणी पेव्हर ब्लॉकची मलमपट्टी केली जात आहे; मात्र सरीवर सरी कोसळत असताना पेव्हर ब्लॉक नीट बसत नाहीत. कोल्डमिक्‍सची मात्राही खड्ड्यांमध्ये उपयोगी पडत नाही, असे खुद्द अधिकाऱ्यांनीच सांगितले.

पूर्व उपनगरातील रस्त्यांतील खड्डे दुरुस्ती कामांची ‘टीम सकाळ’ने शनिवारी पाहणी केली. अंतर्गत रस्त्यांवर काही ठिकाणी खड्डे बुजवण्याची कामे सुरू होती. पावसामुळे या कामांत अडथळे येत होते. काही ठिकाणी पेव्हर ब्लॉकसाठी वापरलेल्या रेतीचा दर्जा निकृष्ट होता. त्यामुळे पेव्हर ब्लॉकखाली चिखल होऊन ते नीट बसत नव्हते. बसवलेल्या पेव्हर ब्लॉकवरून एखादे वाहन गेल्यानंतर पेव्हर ब्लॉक निखळल्याचे दिसत होते. घाटकोपर येथील आझादनगर येथील रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसवताना रेती पावसात वाहून जात असल्याचे दिसले. बसवलेले अनेक पेव्हर ब्लॉक उखडल्याचेही दिसले. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी तुंबल्याने कोल्डमिक्‍स वापरता येत नव्हते. खड्डे कोरडे झाल्याशिवाय कोल्डमिक्‍स घट्ट बसत नाही. त्यामुळे ओल्या खड्ड्यात कोल्डमिक्‍स वापरत नसल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कामगारांचा तुटवडा
काही वॉर्डांमध्ये प्रशासनाने कंत्राटदार नेमले नसल्याने खड्डे दुरुस्तीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे विभाग कार्यालयांमार्फत दुरुस्ती करावी लागत आहे. विभाग कार्यालयांमध्येही कामगारांचा तुटवडा आहे. मोजकेच कामगार असल्याने खड्डे बुजवण्याच्या कामात अडचणी येत आहेत. शनिवारी अर्धा दिवस सुट्टी असल्याने खड्डे दुरुस्त करणारे कर्मचारी विभाग कार्यालयातून निघून गेल्याचे दिसून आले.

पाणी तुंबलेले खड्डे धोकादायक
पावसाचे पाणी तुंबलेल्या खड्ड्यांतून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. दुचाकींसाठी हे खड्डे धोक्‍याचेच ठरत आहेत. पेव्हर ब्लॉक बसवून दुरुस्त केलेल्या खड्ड्यांचा चढउतार गाड्यांसाठी धोकादायक ठरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com