पेंग्विन दर्शनमनाईची याचिका न्यायालयाने फेटाळली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

मुंबई - भायखळ्यातील राणीच्या बागेत ठेवण्यात आलेल्या पेंग्विनच्या दर्शनाला मनाई करण्याची मागणी शुक्रवारी (ता. 24) मुंबई उच्च न्यायालयाने नामंजूर केली. जे परदेशात जाऊन पेंग्विन पाहू शकणार नाहीत त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे, असे स्पष्ट मत न्यायालयाने व्यक्त केले.

मुंबई - भायखळ्यातील राणीच्या बागेत ठेवण्यात आलेल्या पेंग्विनच्या दर्शनाला मनाई करण्याची मागणी शुक्रवारी (ता. 24) मुंबई उच्च न्यायालयाने नामंजूर केली. जे परदेशात जाऊन पेंग्विन पाहू शकणार नाहीत त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे, असे स्पष्ट मत न्यायालयाने व्यक्त केले.

परदेशातून भारतात आणलेल्या पेंग्विनसाठी राणीच्या बागेत विशेष व्यवस्था आणि वातावरण मुंबई महापालिकेने तयार केले आहे. काही दिवसांपूर्वी पेंग्विनचे दर्शनही सुरू झाले. थंड हवामानाची सवय असलेल्या पेंग्विनना मुंबईतील वातावरण झेपणारे नाही आणि राणी बागेमध्ये त्यांची योग्य निगा राखली जाणार नाही. त्यामुळे त्याचे प्रदर्शन थांबवावे, असा आरोप करणारी जनहित याचिका प्राणीप्रेमींनी न्यायालयात केली आहे. मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने राणी बाग व्यवस्थापनाला तेथील व्यवस्था आणि अपुऱ्या सोयी-सुविधांबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली होती. अशा वेळेस पेंग्विनच्या सुरक्षेबाबत संभ्रम निर्माण होतो. तसेच आंतरराष्ट्रीय कायद्यानुसारही पेंग्विनच्या संवर्धनाबाबत नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, असा दावा याचिकादाराच्या वतीने करण्यात आला; मात्र पालिकेच्या वतीने ऍड. अनिल साखरे यांनी याचे खंडन केले. दर वर्षी विविध सरकारी संस्था प्राणिसंग्रहालयाची पाहणी करून सूचना करीत असतात, त्यावर तातडीने अंमलबजावणीही केली जाते, असा दावा त्यांनी केला. जी मुले परदेशात जाऊन पेंग्विन पाहू शकत नाही त्यांच्यासाठी पालिकेने चांगली संधी निर्माण केली आहे, त्याशिवाय अनेक परदेशी पक्षी-प्राणी मूळ वातावरणापेक्षा वेगळ्या देशामधील वातावरणातही रमल्याची उदाहरणे आहेत, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. खंडपीठाने केंद्र सरकारच्या संबंधित प्राधिकरणाला नोटीस बजावली असून याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title: penguin petition reject by court