प्लास्टिक बंदीला हरताळ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

तुर्भे - सरकारने प्लास्टिक बंदी जाहीर केली असली आणि नवी मुंबई महापालिकेने प्लास्टिकमुक्त शहराची घोषणा व जनजागृती केली असली तरी शहरातील बाजार, दुकाने, मॉल, शॉपिंग सेंटर आदी ठिकाणी आजही मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे या प्लास्टिक बंदीला नवी मुंबईत तरी हरताळ फासला जात आहे. 

तुर्भे - सरकारने प्लास्टिक बंदी जाहीर केली असली आणि नवी मुंबई महापालिकेने प्लास्टिकमुक्त शहराची घोषणा व जनजागृती केली असली तरी शहरातील बाजार, दुकाने, मॉल, शॉपिंग सेंटर आदी ठिकाणी आजही मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे या प्लास्टिक बंदीला नवी मुंबईत तरी हरताळ फासला जात आहे. 

प्लास्टिकमुक्त नवी मुंबईचा नारा देणाऱ्या महापालिकेने अनेक महिन्यांपासून शहरात जनजागृती सुरू केली आहे. त्यात अनेक ठिकाणी कार्यक्रम घेऊन नागरिकांना त्याचे महत्त्व आणि प्लास्टिकमुळे पर्यावरणाची होणारी हानी याची माहिती दिली होती. शाळा, महाविद्यालयांमध्येही जनजागृती करून कापडी पिशव्यांचे वाटप केले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारनेही प्लास्टिक बंदी जाहीर केली आहे; परंतु त्यानंतरही दुकानदार, फेरीवाले, मटन-चिकन शॉप, मासे विक्रेते प्लास्टिकच्या पिशव्यांचा खुलेआम वापर करत आहेत. 

प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर, साठा आणि विक्रीवर बंदी आहे. महापालिकाही याच्याविरोधात कारवाई करत आहे. यात 200 हून अधिक दुकानदारांवर कारवाई करून त्यांच्याकडून लाखोंचा दंड वसूल केला आहे; मात्र त्यानंतरही प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर सुरूच आहे. 

शहरातील एक दुकानदार आणि भाजी विक्रेता दररोज 30 ते 150 प्लास्टिकच्या पिशव्यांची पाकिटे खरेदी करतो. यावरून शहरात दररोज किती प्लास्टिकच्या पिशव्यांची खरेदी-विक्री आणि वापर होतो याचा अंदाज येतो. "प्लास्टिकची पिशवी मागू नका' असा फलक लावलेल्या दुकानातही दुकानदार ग्राहकांना प्लास्टिकच्या पिशव्यांमधून साहित्य देतात. ज्या ग्राहकांकडे पिशव्या नसतात त्यांना आम्ही प्लास्टिकच्या पिशव्या देतो. नाहीतर ते माल घेतच नाहीत. त्यामुळे आमचाही नाईलाज आहे, असे अनेक दुकानदारांनी सांगितले. 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर अनेक वर्षांपूर्वीच सरकारने बंदी घातली आहे. त्यानंतरही फळ, भाजी, मासे आणि मटन विक्रेते या पिशव्या वापरत आहेत. त्यामुळे महापालिकेचे अधिकारीही हतबल झाले आहेत. या सर्व प्रकारामुळे प्लास्टिक बंदीचा बोजवारा उडाला आहे. 

आयुक्तांच्या आदेशाने प्लास्टिक पिशव्यांबाबत लवकरच ऍक्‍शन प्लॅन तयार केला जाईल. त्यासंदर्भात काही दिवसांत कार्यशाळा घेतली जाईल. त्यानंतर पुन्हा कारवाई सुरू केली जाईल. शहर प्लस्टिकमुक्त करण्याचा महापालिकेचा मानस आहे. 
- दादासाहेब चाबुकस्वार, पालिका उपायुक्त, परिमंडळ एक 

Web Title: Plastic Banned Strike turbhe news