प्लंबरांची दलाली बंद करण्याची पालिकेत मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

मुंबई - महापालिकेच्या पाणी खात्यातील परवानाधारक नळ कारागीर (प्लंबर) नागरिकांची लूट करत आहेत. नळजोडणीसाठी ते मनाला येईल तेवढे पैसे घेतात. पालिकेत मुकादमापासून जल अभियंत्यांपर्यंतचे अधिकारी-कर्मचारी असताना हे खासगी नळ कारागीर कशाला हवेत, असा प्रश्‍न उपस्थित करत या कारागिरांची दलाली बंद करून नागरिकांची लूट थांबवावी, अशी मागणी सोमवारी महासभेत सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी केली. नळ कारागिरांनी आतापर्यंत केलेल्या कामांची तपासणी करून ठरावाच्या सूचनेवर तत्काळ अभिप्राय सादर करावेत, असे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले.

चाळी व झोपड्यांतील रहिवाशांना जलजोडणी घेताना पालिकेने नेमलेल्या खासगी परवानाधारक कारागिरांची मंजुरी घ्यावी लागते. ते नागरिकांना लुटतात, त्यामुळे नव्या नळजोडणीसाठी नळ कारागिरांच्या मंजुरीची अट वगळून अभियंत्यांमार्फत ही प्रक्रिया पूर्ण करावी, अशी ठरावाची सूचना भाजपच्या शैलजा गिरकर यांनी मांडली. त्याला पाठिंबा देताना सर्व नगरसेवकांनी नळ कारागिरांच्या कारभारावर ताशेरे ओढत ही पद्धत बंद करण्याची मागणी केली.

अर्जाला 15 दिवसांत मंजुरी?
मुंबईत पाणी समस्या गंभीर असून, पाणीचोरीचे प्रकार वाढले आहेत. पालिकेने यावर तोडगा काढण्यासाठी नागरिकांकडून आलेल्या अर्जाला 15 दिवसांत मंजुरी द्यावी. त्याविषयी धोरण तयार करावे, अशी सूचना सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केली.

महापौर महाबळेश्‍वरवरून येतात?
महासभेचे कामकाज कधीच वेळेवर सुरू होत नाही. विद्यमान महापौरांनीही ही प्रथा मोडलेली नाही. महासभेची वेळ सोमवारी दुपारी 2.30ची ठेवण्यात आली होती. महापौर 4.30 वाजता सभागृहात आले, त्या वेळी "महापौर महाडेश्‍वर काय महाबळेश्‍वरवरून येतात का' असा टोला एका नगरसेवकाने लगावला. त्यावर सर्व नगरसेवकांनी महाडेश्‍वर आणि महाबळेश्‍वरच्या नावाने उपरोधिक घोषणा दिल्या.

Web Title: plumber agent clo demand by municipal