पोलिसांचे पगार रखडले

शेखर हंप्रस - सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात दर महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या पगारासाठी आता दहा तारीख उजाडत आहे...

कोपरखैरणे - नवी मुंबई पोलिसांना काही महिन्यांपासून आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून, महिनाअखेरपर्यंत मिळणाऱ्या पगारासाठी आता १० तारखेपर्यंत वाट पाहावी लागत आहे, तर गेल्या अनेक महिन्यांपासून अनियमित पगाराबरोबरच विविध बिलेही रखडली आहेत. या परिस्थितीत दर महिन्याच्या शेवटी घरातील आर्थिक ओढाताण पाहावी की शहर सुरक्षा करावी, याची पोलिसांना चिंता आहे.

यापूर्वीही नवी मुंबई पोलिस दलात अनियमित पगार होत होते. त्या वेळी तत्कालीन आयुक्त के. एल. प्रसाद यांनी परिस्थितीत सुधारणा करत महिनाअखेरीस पोलिसांच्या खात्यात पगार जमा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही महिन्यांपर्यंत पोलिसांना पगार बॅंकेत जमा झाल्याचा मोबाईलवर मेसेज येत होता; मात्र मध्यंतरीच्या काळात व्यवस्था बिघडली. पगारासाठी महिनाअखेरऐवजी दहा तारीख उजाडत आहे. यासंदर्भात पोलिस दलातील नाराजी लक्षात घेत आयुक्त हेमंत नगराळे यांनी वेळेवर पगार देण्यासाठी पावले उचलली आहेत; मात्र ‘कारकुनी’ कारभारामुळे त्यांचे प्रयत्न पूर्ण होत नसल्याची चर्चा आहे.

घरभाडे, मुलांच्या शाळेची फी, दुधाचे बिल, किराणा, दैनंदिन खर्च आदी भागविताना पोलिसांना नाकीनऊ येत आहेत. विशेषतः एक तारखेपासून बिलासाठी तगादा लावला जात असल्यामुळे पोलिस हैराण आहेत.

पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना मेडिकल, विविध भत्ते, विकलेली रजा, राहिलेली रजा आदींचे पैसे मिळतात. त्याचा ‘बिले’ असा उल्लेख केला जातो. गेल्या काही महिन्यांपासून बिलाची रक्कम थकलेली आहे. दरमहा बिले मंजूर होण्याची अपेक्षा असते; परंतु कारकुनी कारभारामुळे बिले रखडल्याची पोलिस कर्मचाऱ्यांची तक्रार आहे.

मी काही दिवसांपूर्वीच पदावर रुजू झालो आहे. आयुक्तांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे कोणतेही काम मागे न राहण्यावर कटाक्ष ठेवला जात आहे. पगार व इतर बिले लवकरच सुरू होतील. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, याच महिन्यापासून प्रक्रिया सुरळीत होईल.

- डॉ. सुधाकर पाठक, उपायुक्त (प्रशासन)

Web Title: Police salaries held