किती काळ सहन करायची ही दुर्गंधी?

किती काळ सहन करायची ही दुर्गंधी?

नवी मुंबई - ठाणे औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपन्या सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट नाल्यात सोडतात. नवी मुंबई महापालिकेचे तत्कालिन आयुक्त तुकाराम मुंढे आणि विद्यमान आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी त्याची दखल घेत अशा कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतरही त्यामध्ये बदल झाला नाही. त्यावर कळस म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अशा कंपन्यांना ‘क्‍लीन चिट’ दिल्यामुळे तर कंपन्यांचे फावले आहे. या प्रदूषणाचा त्रास सहन करणाऱ्या सानपाडा, जुईनगर, वाशी, घणसोली, घरोंदा, नोसील नाका येथील रहिवाशांच्या तर आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला असून, ‘ही दुर्गंधी किती काळ सहन करायची’, असा सवाल ते करत आहेत. 

नवी मुंबईतील ठाणे औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (सीईटीपी) आहे; परंतु या भागातील काही कंपन्या प्रक्रियेचा खर्च वाचवण्यासाठी ‘सीईटीपी’ऐवजी रसायनमिश्रीत सांडपाणी थेट नाल्यांमध्ये सोडतात. त्यामुळे नाल्यांचे प्रदूषण वाढले आहे. उग्र वास, डोळ्यांची आग होणे, त्वचेला खाज येणे अशा त्रासाला नाल्यांच्या नजिकच्या इमारतींमधील राहणाऱ्यांना होत आहे. 

सानपाडा सेक्‍टर ११ येथील भूमी, बालाजी, साईअंश, वसुंधरा हाईट आणि मिलेनियम टॉवर डी. टाईप येथील नाल्यातून येणाऱ्या उग्र वासासंदर्भात रहिवाशांनी तक्रारी केल्या आहेत. संध्याकाळी येथील रहिवाशांना घरांच्या खिडक्‍या बंद करण्याशिवाय पर्याय नसतो. उग्र वासामुळे मळमळने, डोळे चुरचरणे, हाताला खाज येणे अशा प्रकारचा त्रास सोसावा लागत आहे, अशी माहिती गृहिणींनी दिली. 

घणसोली सेक्‍टर ९ परिसरातील नाल्यात रबाळे एमआयडीसीतील कंपन्यातून रसायनमिश्रीत पाणी सोडले जाते. त्यामुळे येथे उग्र वास येतो. 

याबाबतच्या तक्रारी केल्यानंतर गेल्या वर्षी पालिका अधिकाऱ्यांनी थेट नाल्यात उतरून प्रदूषणास कारणीभूत असलेल्या कंपन्यांचा शोध घेतला होता. त्या वेळी एमआयडीसीतील तब्बल ८३ कंपन्यांनी रसायनमिश्रीत पाणी सोडण्यासाठी नाल्यात जलवाहिन्या टाकल्याची गंभीर बाब उघड झाली होती. त्यानंतर महापालिकेने संबंधित नोटिसा बजावून गुन्हे दाखल करण्याची ताकीदही दिली होती. 

याबाबत महाराष्ट्र प्रदूषण 
नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीकडे कंपन्यांची यादीही पाठवली आहे; परंतु कारवाई झाली नाही. या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नवी मुंबई प्रादेशिक अधिकारी अनंत हर्षवर्धन यांच्याशी संपर्क झाला नाही.  

सानपाडा आणि जुईनगर भागातील रहिवासी अनेक वर्षांपासून नाल्यातून येणाऱ्या दुर्गंधीने हैराण आहेत. हा त्रास बंद व्हावा, याकरिता तत्कालिन आयुक्त राजेश वाघमारे, आबासाहेब जऱ्हाड, तुकाराम मुंढे आणि डॉ. एन. रामास्वामी यांच्याकडे पाठपुरावा केला; पण परिस्थिती जैसे थे  आहे.
- ऋचा पाटील, नगरसेविका, सानपाडा 

घणसोली नाल्यातील उग्र वासाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्या; पण त्याची कोणीही दखल घेत नाही. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही आवाज उठवला; पण त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
- दीपाली सकपाळ, नगरसेविका, घणसोली

धोक्‍याची पातळी ओलांडली!
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नाल्यातील पाण्याचे प्रदूषण ओळखण्यासाठी बीओडी (बायोलॉजिकल ऑक्‍सिजन डिमांड) आणि सीओडी (केमिकल ऑक्‍सिजन डिमांड) या दोन तपासण्या केल्या आहेत. त्यामध्ये जल प्रदूषकांनी धोक्‍याची पातळी ओलांडल्याचे स्पष्ट झाले आहे. पाण्यात क्‍लोराईडचे प्रमाण एक हजार एमपीएल (मिलीग्राम पर लिटर) असायला पाहिजे ते एक हजार ५०० पेक्षा अधिक आहे. बीओडी ३५० एमपीएल असायला हवे आहे, ते ७५० ते १५०० एमपीएलपेक्षा अधिक आहे. सस्पेक्‍टेड सॉलिडचे प्रमाण ६०० एमपीएल असायला पाहिजे, ते ३५०० एमपीएलच्या पुढे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com