सकट मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

मुंबई - भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची साक्षीदार असलेल्या पूजा सकट हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी; तसेच तिच्या मृत्यूस जबाबदार आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. पूजाच्या कुटुंबाचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असेही ते म्हणाले. पूजाचा मृत्यू संशयास्पद झाल्याचे समजताच आपण तेथील जिल्हा पोलिस अधीक्षकांशी चर्चा केली. या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे. पूजाच्या कुटुंबाला रिपब्लिकन पक्षातर्फे तत्काळ एक लाखाची मदत दिली जाईल; तसेच मुख्यमंत्री फंडातून सांत्वनपर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असेही आठवले यांनी सांगितले. भीमा कोरेगाव प्रकरणातील भयग्रस्त मागासवर्गीय कुटुंबीयांचे कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावे, यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार आहेत, असेही ते म्हणाले.
Web Title: pooja sakat death case inquiry ramdas athawale