गर्भवती, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास! 

pregnant women and senior citizens free acto drive
pregnant women and senior citizens free acto drive

विक्रोळीतील रिक्षाचालकाची माणुसकी 
घाटकोपर :  रिक्षाचालक म्हटला की त्याचे अरेरावीने वागणे सर्वप्रथम नजरेसमोर येते; तरीही "हाताची सगळीच बोटे सारखी नसतात' अशी म्हण खरी ठरवणाऱ्यांची संख्याही कमी नाही. हरवलेल्या माणुसकीत कुठे तरी झरा वाहताना दिसतो. जाता-येता रस्त्यात कुठे गर्भवती किंवा ज्येष्ठ नागरिक दिसला की अदबीने "बसा, कुठे सोडू' असे विचारून त्यांना घरापर्यंत पोहचवण्याची जबाबदारी "तो' सांभाळतो; चक्क एकाही दमडीची अपेक्षा न करता! विक्रोळी पार्कसाईट येथील साधू दगडू भोरे (वय 47) यांची ही "मोफत सेवा' परिसरात कौतुकाचा विषय ठरली आहे. 
सायंकाळी थकूनभागून घराकडे परतणारा मुंबईकर अनेक वेळा रिक्षाने वाट धरतो. अनेक वेळा रिक्षाचालक लांबचे भाडे बिनधास्त नाकारतात. अशा वेळी रिक्षा मिळणे कठीण जाते. त्यातच प्रत्येक रेल्वेस्थानकाबाहेर ठराविक अंतरासाठी "शेअर रिक्षा' सुरू झाल्याने तेथील रिक्षाचालक मीटरवरही काही भाडे टाळत आहेत. भाडे नाकारण्यावरून अनेक वेळा प्रवासी व रिक्षाचालकांत वादही होतात. अशातच विक्रोळी पार्कसाईटमधील राहुलनगर येथे राहणारे रिक्षाचालक भोरे त्याला अपवाद ठरले आहेत. अनेक वर्षांपासून ते रिक्षा चालवतात. पार्कसाईट ते स्थानक रोड असा त्यांचा दररोजचा प्रवास. यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. दिवस-रात्र ते रिक्षा चालवतात. कुटुंबाचा गाडा हाकताना दमछाक होत असतानाही त्यांनी माणुसकीचा धर्म विसरलेला नाही. भाडे पूर्ण करून रस्त्याने जाता-येता कुणी गर्भवती किंवा ज्येष्ठ नागरिक दिसले तर भोरे त्यांच्यासाठी थांबतात. मोठ्या अदबीने त्यांना "कुठे जाणार? बसा रिक्षात, घरापर्यंत सोडतो', असे सांगतात. इतकेच नाही, तर या सेवेपोटी भोरे अशा प्रवाशांकडून एक रुपयाही घेत नाहीत. त्यांच्या या सेवेमुळे भोरे परिसरात कौतुकाचा विषय ठरले आहेत. 

माझ्या मानसिक समाधानासाठी मी ही मोफत सेवा देतो. दिवसभर रिक्षा चालवून उदरनिर्वाहाची गरज भागली की इतर वेळेत मी गर्भवती किंवा ज्येष्ठ नागरिकांना मोफत सेवा देतो. दिवसभराच्या कामाच्या व्यापातून त्यामुळे खूप आनंद मिळतो. 
- साधू भोरे, रिक्षाचालक, विक्रोळी. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com