महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी हेल्पलाइन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

मुंबई - सोशल मीडियाद्वारे महिलांचा मानसिक छळ करणाऱ्यांविरोधात आवाज उठवण्यासाठी बळ मिळावे यासाठी 8888809306 या टोल फ्री क्रमांकाची घोषणा मंगळवारी करण्यात आली. "नाना चुडासामा आय लव्ह मुंबई कमिटी'च्या वतीने हा हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला. "सकाळ' माध्यम समूह आणि भाजपच्या प्रवक्‍त्या शायना एन. सी. यांनी पुढाकारातून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. 

मुंबई - सोशल मीडियाद्वारे महिलांचा मानसिक छळ करणाऱ्यांविरोधात आवाज उठवण्यासाठी बळ मिळावे यासाठी 8888809306 या टोल फ्री क्रमांकाची घोषणा मंगळवारी करण्यात आली. "नाना चुडासामा आय लव्ह मुंबई कमिटी'च्या वतीने हा हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला. "सकाळ' माध्यम समूह आणि भाजपच्या प्रवक्‍त्या शायना एन. सी. यांनी पुढाकारातून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. 

जागतिक महिला दिनाच्या आदल्या दिवशी आझाद मैदानातील "प्रेस क्‍लब'मध्ये झालेल्या कार्यक्रमात ही टोल फ्री दूरध्वनी सेवा सुरू झाल्याचे जाहीर करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रमोद कोदे आदी मान्यवरांनी या वेळी उपस्थित राहून "सकाळ'च्या या लोकोपयोगी उपक्रमास पाठिंबा दर्शविला. महिलांच्या हितासाठी चांगले उपक्रम हाती घेण्याच्या परंपरेनुसार "सकाळ'ने सुरू केलेली ही सेवा लाभदायक आहे, अशी प्रतिक्रिया अनेक महिलांनी या वेळी व्यक्त केली. 

आमदार नीलम गोऱ्हे, आमदार वर्षा गायकवाड व शायना एन. सी. यांना मोबाईलवर अश्‍लील मेसेज आल्याने खळबळ उडाली आहे. राजकीय क्षेत्रातील महिलांना असे अनुभव येत असतील, तर सर्वसामान्य महिलांना किती वाईट अनुभव येत असतील याचा विचार करून ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे, असे शायना एन. सी. म्हणाल्या. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रमोद कोदे म्हणाले, की समाज घडवण्यात महिलांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांना मोकळा श्‍वास घेता आला पाहिजे. निर्भयपणे वावरता आले पाहिजे. फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियाचा समाजासाठी सकारात्मक वापर करणे आवश्‍यक आहे. 

"कोरो इंडिया'च्या महिला सक्षमीकरण सेलच्या (गोवंडी) अन्वरी खान यांनीही स्थानिक पातळीवरील काम करतानाचे अनुभव या वेळी सांगितले. गोवंडी, शिवाजीनगर परिसरात महिलांना त्रास देणाऱ्या पुरुषी प्रवृत्तीला आम्ही संस्थेमार्फत विरोध करत आहोत. तक्रार दिल्यावर पोलिसांकडूनही वाईट वागणूक मिळते, असे त्या म्हणाल्या. 

समाजाची दुतोंडी मानसिकता 
महिला दिन आला की महिलांना मानसन्मान मिळतो. त्यांची तुलना कालिमाता, दुर्गा व सरस्वतीशी केली जाते. दुसरीकडे त्यांना अत्याचार सहन करावे लागतात. समाजाची ही मानसिकता बदलली पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण या वेळी म्हणाले. "सकाळ' (मुंबई)चे निवासी संपादक राहुल गडपाले या प्रसंगी उपस्थित होते.

Web Title: Prevention helpline for abused women