जीवनावश्‍यक वस्तूंच्या किमती तेवढ्याच; वजन घटले!

वाहतुकीचा खर्च वाढल्‍याने सर्वच वस्‍तूंच्या किमती महागल्‍या आहेत; मात्र किमती वाढविल्यास ग्राहक पर्याय शोधतात, हे लक्षात घेऊन अनेक कंपन्यांनी किमती तेवढ्याच ठेवल्‍या; मात्र वस्‍तूंचे वजन, आकार कमी केला
prices of essential commodities
prices of essential commoditiesEsakal

वाशी : इंधन दरवाढीचे चटके सर्वसामन्यांना बसत असताना मालवाहतूकदारांचीही डोकेदुखी वाढली आहे. वाहतुकीचा खर्च वाढल्‍याने सर्वच वस्‍तूंच्या किमती महागल्‍या आहेत; मात्र किमती वाढविल्यास ग्राहक पर्याय शोधतात, हे लक्षात घेऊन अनेक कंपन्यांनी किमती तेवढ्याच ठेवल्‍या; मात्र वस्‍तूंचे वजन, आकार कमी केला आहे. साबण, टूथपेस्ट, शॅम्पू, फेसवॉश, बिस्किटे आदी वस्‍तूंना याचा फटका बसला आहे. २० ग्रॅम टूथपेस्टचे वजन १८ किंवा १५ ग्रॅम करण्यात आले आहे. हीच स्‍थिती शॅम्‍पू, फेसवॉशची आहे; काही कंपन्यांनी बिस्किटाचा आकार लहान केला आहे. त्‍यामुळे इंधन दरवाढीचा अप्रत्‍यक्ष फटका सामान्यांना बसला आहे.

पेट्रोलच्या दरवाढीमुळे दुचाकी, चारचाकी वाहने चालविणे दिवसागणिक जिकिरीचे होत आहे. त्‍यात डिझेल दरवाढीचा फटका मालवाहतुकीला बसला असून धान्य, भाजी, दूध यासह अत्यावश्यक वस्तूंचे दर वाढण्याची शक्यता आहे. मालवाहतूक प्रामुख्‍याने ट्रक, टेम्पो, डम्‍परमधून होते. डिझेलचे दर वाढल्याने आपसूकच वाहतूक खर्चातही वाढ होणार आहे. २० मार्चपासून डिझेल दरात सातत्‍याने वाढ होत आहे. याचा मोठा फटका हातावरचे पोट असलेले कामगार, मजूर आणि गरीब वर्गाला बसण्याची शक्यता आहे.

आठवडाभरात सहा रुपयांची वाढ

नोव्हेंबरमध्ये डिझेल प्रतिलिटर १०६ रुपयांपर्यंत गेले होते. मात्र डिझेलच्या दरात १० रुपये उत्पादन शुल्क कमी केल्याने नोव्हेंबर ते मार्चच्या मध्यापर्यंत दर स्‍थिर ९४.१४ होता; परंतु कच्च्या तेलाचे दर वाढल्‍याने २२ मार्चपासून डिझेलचा दर वाढून आजघडीला १०३.०२ रुपये आहे. आठवडाभरात डिझेलच्या दरात सहा रुपयांची वाढ झाली आहे.

आधीच कोरोनामुळे व्यवसायाचे नुकसान झाले आहे, आता त्‍यात इंधन दरवाढीची भर पडली आहे. वाढलेल्या खर्चामुळे ट्रकची मागणी कमी झाली आहे. व्यवसाय घाट्यात आहे. मात्र चालकांना पगार देणे, इतर खर्च करावाच लागतो.

- राम इचके, ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक.

वर्षभरात १६ रुपयांनी महागले

एप्रिल २०२१ मध्ये डिझेलचे दर ८७.९६ रुपये प्रतिलिटर होते. आजचा दर १०३.९२ इतका आहे. वर्षभरात डिझेल १६ रुपयांनी महागले आहे. दरवाढीचा सिलसिला असाच चालू राहिला तर मालवाहतूक खर्चात वाढ होऊन सर्वसामान्यांना फटका बसण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com