परीक्षेसाठी कैद्याला अंतरिम जामीन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

मित्राची हत्या केल्याचा आरोप; टीवायबीएची परीक्षा देणार

मित्राची हत्या केल्याचा आरोप; टीवायबीएची परीक्षा देणार
मुंबई - खटला प्रलंबित असलेले कच्चे कैदी आणि कैद्यांसमोर एक चांगले उदाहरण ठेवावे, या उद्देशाने उच्च न्यायालयाने हत्येचा आरोप असलेल्या 24 वर्षीय युवकाला अंतरिम जामीन दिला. तृतीय वर्ष कला शाखेची परीक्षा देण्यासाठी एक महिन्याचा अंतरिम जामीन त्याला देण्यात आला आहे. येरवडा तुरुंगात सध्या तो हत्येच्या आरोपाखाली शिक्षा भोगत आहे.

पाच एप्रिलपासून सुरू होणाऱ्या टीवायबीएच्या परीक्षेला बसण्याची परवानगी त्याने अर्जाद्वारे मागितली होती. उच्च न्यायालयाचे न्या. रणजित मोरे आणि न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षेसाठीही न्यायालयाने परीक्षा कालावधीपुरता जामीन मंजूर केला होता. पण आता अंतिम परीक्षा असल्याने न्यायालयाने किमान एक महिन्याचा जामीन द्यावा, तसेच शिक्षण घेऊन चांगले आयुष्य जगण्याची संधी न्यायालयाने द्यावी, अशी मागणी त्याने अर्जात केली होती.

मित्रांसोबत सोसायटीत खेळत असताना झालेल्या वादातून ही हत्या झाली होती. नोव्हेंबर 2009 मध्ये आरोपीला अटक करण्यात आली होती. तीन वर्षे खटला चालल्यानंतर 2012 मध्ये त्याला शिक्षा ठोठावण्यात आली. या शिक्षेविरोधात त्याने केलेले अपील उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. घटनेच्या वेळी त्याचे वय 18 वर्षे 4 महिन्यांचे होते. पोलिस तपास आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू असतानाही त्याने बारावीची परीक्षा दिली होती, पण काही गुण कमी पडल्याने एका विषयात तो अनुत्तीर्ण झाला होता. शिक्षा झाल्यानंतर त्याने बारावीच्या ऑक्‍टोबर परीक्षेसाठी "फर्लो'चा (संजित रजा) अर्ज केला होता, पण उच्च न्यायालयाने तो फेटाळला होता. तरीही खचून न जाता त्याने पुन्हा मार्च 2013 मध्ये पॅरोलसाठी अर्ज केला. परीक्षेच्या कालावधीपुरता त्याला पॅरोल मंजूर झाला होता. त्यानंतर पुण्याच्या डी. वाय. पाटील आर्ट, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयात कला शाखेत त्याने प्रवेश घेतला.

सुनावणीस विलंब झाल्याबाबत नाराजी
परीक्षा कालावधीपुरती सुटी मिळावी आणि त्यानंतर पुन्हा तुरुंगात परतण्याची हमी त्याने प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षेच्या वेळी पाळली होती, ही बाब वकिलांनी खंडपीठाच्या निदर्शनाला आणून दिली. त्यावर 2012 पासून त्याच्या अपिलावरील सुनावणी प्रलंबित असल्याबाबत खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. अर्ज केलेला कैदी विद्यार्थी आहे. त्यामुळे या मुद्द्यावर तरी त्याचे अपील तात्काळ सुनावणीला घेण्याची गरज आहे, असे मत न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे केवळ परीक्षा कालावधीपुरता नव्हे, तर अभ्यासासाठीही वेळ मिळावा यासाठी परीक्षेपूर्वी 15 दिवस आणि परीक्षेचा काळ असा एक महिन्याचा अंतरिम जामीन न्यायालयाने मंजूर केला.

Web Title: prisoner bell for exam