ठाणे - वाडा डंपींग ग्राउंडची समस्या लवकरच सुटणार 

wada
wada

वाडा : शहराची वर्षानुवर्षे खितपत पडलेली डंपींग ग्राउंडची समस्या सोडविण्यात नवनिर्मित वाडा नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा, मुख्य अधिकारी सर्व नगरसेवक, नगरसेविका यांना यश आले असून साधारण मे महिन्याच्या सुरुवातीलाच डंपींग ग्राउंड शहरानजीक असलेल्या उमरोठा रस्त्याजवळील एका खाजगी जागेत स्थलांतरीत करण्यात येणार आहे. 

आज कित्येक वर्षे शहराचे डंपींग ग्राउंड वाडा - भिवंडी महामार्गावर असल्याने शहराच्या प्रवेशद्वारावरच घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. कचरा पेटविल्यानंतर मोठ्या प्रमाणात होणारा धूर महामार्गावर पसरल्याने रस्ता दिसणेही कठीण होत असे. डंपींग ग्राउंडवर मोकाट जनावरेही असल्याने वाहतूकीसाठी अडथळा होत असे त्यामुळे वाहन चालकांची वाहने चालवताना पुरती दमछाक होत होती. शहरातही ठिकठिकाणी कचरा साठत असल्याने नागरिकांना मुख्य बाजारपेठ व गावातून जाता येतांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता.

शहरातील घराघरातून सुका व ओला कचरा वेगवेगळा गोळा करण्यात येणार असून डंपींग ग्राउंडवर प्लास्टिक, लोखंडासारखा कचरा भंगारमध्ये देण्यात येणार आहे तर ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे वाडा शहराची मुख्य समस्या असलेल्या डंपींग ग्राउंडची समस्या जवळजवळ संपुष्टात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे गटनेते संदीप गणोरे यांनी सांगितले.

पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. 24) नवीन डंपींग ग्राउंडची पहाणी करून माहिती देण्यात आली. त्यावेळी नगराध्यक्षा गितांजली कोलेकर, शिवसेनेचे गटनेते संदीप गणोरे, भाजपचे गटनेते मनिष देहेरकर, आरोग्य व स्वच्छता समितीचे रामचंद्र जाधव, विशाखा देहेरकर, आरोग्य व स्वच्छता समितीचे रामचंद्र जाधव, विशाखा पाटील, नगरसेवक प्रकाश केणे, रामचंद्र भोईर, अरुण खुलात, नगरसेविका शुभांगी धानवा, मुख्य अधिकारी विठ्ठल गोसावी आदी उपस्थित होते.

नगर पंचायतीने डंपींग ग्राउंडसाठी  भाडेतत्वावर जागा घेतली असून त्या जागेवर कचऱ्याची विभागणी करून खत निर्मिती व अन्य पद्धतीने नगर पंचायतीस आर्थिक उत्पन्न  होईल असा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे शहरातील घनकचरा निर्मूलन होऊन शहर स्वच्छ राखण्यात अधिकच मदत होणार आहे. 
- विठ्ठल गोसावी,
मुख्य अधिकारी, नगर पंचायत वाडा.

वर्षानुवर्षे शहराची डंपींग ग्राउंडची असलेली समस्या अवघ्या तीन चार महिन्यात सर्व पक्षांच्या नगरसेवक, नगरसेविका यांच्या सहकार्याने लवकरच संपुष्टात येत आहे याचा आनंदच होत आहे. शहरातील स्वच्छतेबाबत एकदोन दिवसात आम्ही जनजागृती करणार असून शहरातील नागरिकांनीही आपले वाडा शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सहकार्य करावे.
- गीतांजली कोलेकर, 
नगराध्यक्षा, नगर पंचायत, वाडा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com