कैदीच करणार एड्‌सबाबत जनजागृती

Aids
Aids

मुंबई - एचआयव्हीबाधित कैद्यांना उपचार मिळावेत म्हणून आता तुरुंगातच लिंक एआरटी केंद्र सुरू करण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला आहे. लिंक एआरटीमुळे कैद्यांना वेळोवेळी औषधोपचार मिळतील. एचआयव्ही वा एड्‌सबाबत कैदीच जनजागृती करणार असून त्यांना सामाजिक संस्था त्याबाबतचे प्रशिक्षण देणार आहेत.

तुरुंग प्रशासनाच्या अंतर्गत राज्यात नऊ मध्यवर्ती, 31 जिल्हा, 13 खुली आणि 172 उपकारागृहे आहेत. शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्ये संसर्गजन्य आजाराचे प्रमाण अधिक आहे. तुरुंग प्रशासनाकडे असलेल्या दवाखान्यांमध्ये फारशा सुविधाही नसतात. पूर्वी काही तुरुंगांत सुरू करण्यात आलेली एचआयव्ही तपासणी केंद्रे कालांतराने बंद झाली.

एचआयव्हीबाधित कैद्यांच्या उपचाराच्या योजनांबाबत 12 वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली गेली होती. नुकतीच तुरुंग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य एड्‌स नियंत्रण संस्थेच्या (एमसॅक्‍स) प्रकल्प संचालकांची भेट घेऊन त्यांना राष्ट्रीय एड्‌स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या सूचनांनुसार सर्व मध्यवर्ती आणि प्रथम वर्ग तुरुंगांत एआरटी लिंक सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

काय आहे लिंक एआरटी सेंटर?
लिंक एआरटी सेंटरमध्ये रुग्णांचा वेळ आणि पैसा वाचवण्याचा मुख्य हेतू असतो. जे रुग्ण नियमित औषध घेतात, ज्यांना इतर संसर्गजन्य आजार नाहीत आणि ज्यांची पांढऱ्या पेशींची संख्या 350 पेक्षा जास्त आहे, अशा रुग्णांची औषधे तिथे ठेवली जातात. केंद्रात गोपनीयता पाळली जाते. कैद्यांना एचआयव्हीची बाधा झाल्यास त्याला तुरुंगातच लिंक एआरटी केंद्रामार्फत औषधे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. दर तीन महिन्यांनी औषधाकरिता कैद्यांना एआरटी केंद्रात नेले जाईल.

कित्येकदा पोलिस बंदोबस्त न मिळाल्याने औषधे वेळेवर मिळत नाहीत, अशा तक्रारी यापुढे रुग्ण करणार नाहीत, असा लिंक एआरटी सेंटरमागील हेतू आहे. एड्‌सबाधित कैद्यांना सहा महिन्यांतून एकदा एआरटी केंद्रात पाठवले जाईल.

कैदीच बनणार समुपदेशक
कैद्यांमध्ये एचआयव्ही आणि गुप्तरोगाबाबत माहिती होण्याच्या हेतूने त्यांना पिअर एज्युकेटर म्हणून नेमले जाणार आहे. ते समुपदेशक म्हणून तुरुंगात काम करतील. अशा समुपदेशकांना सामाजिक संस्थांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.

कारागृहात लिंक एआरटी सेंटर सुरू केले जाणार आहे. त्यामुळे कैद्यांना औषधोपचार मिळतील. बचतगटातील जागरूक कैदी समुपदेशन करतील.
- डॉ. भूषणकुमार उपाध्याय, अप्पर पोलिस महासंचालक, तुरुंग विभाग

रुग्णांची तीन वर्षांतील आकडेवारी
वर्ष एचआयव्हीबाधित रुग्ण एआरटी केंद्रात पाठवण्यात आलेले रुग्ण
- 2015-16 255 160
- 2016-17 153 95
- 2017-18 135 106
(संदर्भ : सार्वजनिक आरोग्य विभाग)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com