रेल्वे ई-तिकिटे बेकायदा विकणाऱ्या दोघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

मुंबई - बेकायदा सॉफ्टवेअरद्वारे रेल्वेची ई-तिकिटे देणाऱ्या दोन दलालांना शनिवारी (ता. 20) दादर रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) अधिकाऱ्यांनी लोअर परळ येथून अटक केली. त्यांच्याकडून सव्वा दोन लाखांची ई-तिकिटेही हस्तगत करण्यात आली आहेत. 

सतीश बरनवाल आणि विकासकुमार बरनवाल अशी अटक करण्यात आलेल्या दलालांची नावे आहेत. आरपीएफच्या पथकाने शनिवारी रात्री लोअर परळ येथील महावीर चाळीतील आरोपींच्या दुकानावर छापा टाकला. अधिकृत दलालांना ठराविक कालावधीतच ई-तिकीट काढण्यास परवानगी देण्यात आली आहे; पण हे दोन दलाल कोणत्याही वेळी ई-तिकीट काढून देत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या संगणकात रेडमिर्ची आणि निओ हे ई-तिकीट काढणारे बेकायदा सॉफ्टवेअर आढळले; तसेच आरोपींकडे सव्वा सात हजार रुपयांची ई-तिकीटेही सापडली. सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी आरोपींची चौकशी केल्यावर त्यांनी ई-तिकीट काढण्यासाठी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर अनेक नावांनी बनावट यूजर आयडी तयार केल्याचेही निष्पन्न झाले. या यूजर आयडीचा वापर करून त्यांनी एक लाख 10 हजार रुपयांची ई-तिकिटे काढली होती. आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा संगणक जप्त करून त्यांना अटक केली. आरोपी प्रत्येक ई-तिकिटामागे 200 ते हजार रुपये कमिशन घेत असल्याचेही चौकशीत उघड झाले आहे.