वैतरणा पुलाच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटबाबत रेल्वे अनभिज्ञ

वैतरणा पुलाच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटबाबत रेल्वे अनभिज्ञ

सफाळे - काही वर्षांपासून बेकायदा सुरू असलेल्या रेतीउत्खननामुळे नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या आणि पश्‍चिम रेल्वे मार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ब्रिटिशकालीन वैतरणा पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट कधी झाले, याची माहितीच रेल्वे प्रशासनाकडे नसल्याची खळबळजनक बाब माहितीच्या अधिकाराखाली मागविण्यात आलेल्या पत्रातून समोर आली आहे. रेल्वेच्या या बेजबाबदारपणामुळे आज हा पूल कोसळण्याच्या स्थितीत असून आज लाखो प्रवासी मृत्यूची टांगती तलवार घेऊन या मार्गावरून प्रवास करीत आहेत.


वैतरणा खाडीवरील 92 व 93 या दोन्ही लोखंडी पुलाला जवळपास 100 वर्षे पूर्ण होत आली असून ते अतिशय जीर्ण झाले आहे. वर्षानुवर्षे समुद्रातील खाऱ्या पाण्याचा मारा व दैनंदिन रेल्वे वाहतुकीच्या भारामुळे हा पूल दिवसेंदिवस कमकुवत झाला आहे. यावर पर्याय म्हणून पश्‍चिम रेल्वेने साधारण आठ ते दहा वर्षांपूर्वी सोमा कंपनीमार्फत दुसऱ्या पुलाच्या उभारणीचे काम हाती घेतले होते. मात्र काही वर्षे संथ गतीने चालणाऱ्या नव्या पुलाचे काम सध्या बंद पडले आहे.

याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते प्रथमेश प्रभूतेंडोलकार यांनी पश्‍चिम रेल्वे प्रशासनाकडे रेल्वे पुलासंदर्भातील माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती. त्यावर रेल्वेच्या मुंबई सेंट्रल येथील जन माहिती अधिकारी कार्यालयातून देण्यात आलेल्या उत्तरातून खळबळजनक माहिती समोर आली आहे. यात वैतरणा खाडीपुलावरील दोन्ही पुलांच्या शेवटच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटची माहिती रेल्वेकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट झालेच नसणार हे सिद्ध होत आहे. रेल्वेने या पुलासंदर्भात ठाणे व पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र पाठवून तेथील बेकायदा रेतीउपशामुळे भविष्यात मोठा अपघात होऊ शकतो, असे वारंवार कळविले आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत ठोस कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

दैनंदिन वाहतुकीचा वाढता भार
वैतरणा पुलावरून लोकल, शटल, एक्‍स्प्रेसमधून लाखो लोक प्रवास करीत असतात. तसेच अवजड मालवाहतूक करणाऱ्या मालगाड्याही दिवसरात्र ये-जा करीत असतात. त्यातच वाढत्या प्रवासी संख्येमुळे लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशा मागण्या रेल्वे प्रवाशांकडून सतत होत आहेत. त्या दृष्टीने या पुलांवर दैनंदिन वाहतुकीचा भार वाढत जाण्याची चिन्हे आहेत. तसेच पुलाखालून बेसुमार रेतीउपसा करण्यात आला असून सरकारने निर्बंध घालूनही चोरट्या मार्गाने रेतीउपसा सुरूच आहे. याकडे दुर्लक्षच केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com