रामदास आठवलेंची पुन्हा ऐक्‍याची हाक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

प्रकाश आंबेडकरांना अध्यक्षपद देण्याची तयारी
मुंबई - आंबेडकरी समाजाचे ऐक्‍य होणे ही काळाची गरज आहे. ऐक्‍य झाल्यास एकीकृत पक्षाचे अध्यक्षपद ऍड. प्रकाश आंबेडकर यांना देऊ, अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिली.

दिवंगत साहित्यिक भीमसेन देठे, पुण्याचे दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे व पॅंथर नारायण लगाडे यांना आदरांजली वाहण्यासाठी गोराई येथील बे व्ह्यू हॉटेलच्या हॉलमध्ये आज सभा घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते. या वेळी ऍड. प्रकाश आंबेडकर यांचे सहकारी आणि ज्येष्ठ पॅंथरनेते ज. वि. पवार उपस्थित होते. महापालिका निवडणुकांमध्ये आंबेडकरी संघटना आणि पक्षांचा दारूण पराभव झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर आठवले म्हणाले की, आंबेडकर पवारांचे ऐकू शकतात, त्यांनी ऐक्‍याचा निरोप त्यांना द्यावा. समाजाच्या हितासाठी रिपब्लिकन ऐक्‍य ही काळाची गरज आहे. रिपब्लिकन ऐक्‍याचे अध्यक्षपद आंबेडकरांनी स्वीकारावे, असे आवाहनही आठवले यांनी केले.

वस्ती पातळीपासून राज्य स्तरापर्यंत ऐक्‍याची प्रक्रिया केली पाहिजे. ऐक्‍य टिकत नाही, त्यासाठी केवळ नेत्यांना नावे ठेवून चालणार नाही, त्यासाठी लोकांनीही विचार केला पाहिजे. केवळ स्वार्थासाठी ऐक्‍यातून फुटणाऱ्या नेत्यांच्या गटांचे फलक आपल्या वस्तीत लावून त्यांना पाठिंबा देणे बंद केले पाहिजे, असेही आठवले म्हणाले. सभेच्या अध्यक्षस्थानी कमलेश यादव होते. भदंत आनंद बोधी, ज्येष्ठ साहित्यिक सुहास सोनवणे, शिवा इंगोले, लक्ष्मण गायकवाड आदींनी या वेळी आदरांजली वाहिली. दिवंगत सिनेअभिनेत्री रिमा लागू यांनाही या वेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

Web Title: ramdas athawale again aikya announcing