युतीच्या फेरविचाराचा आग्रह? 

युतीच्या फेरविचाराचा आग्रह? 

मुंबई  - भारतीय जनता पक्षाची साथ सोडल्यास अवघ्या नऊ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला विजय मिळेल, अशी भीती असल्याने युतीबाबत फेरविचार करावा, अशी भूमिका शिवसेनेतील एका गटाने घेतली असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येयधोरणांविरोधातील संयुक्त आघाडीत शिवसेनेला जागा मिळणे शक्‍य नसल्याने युतीचाच फेरविचार व्हावा, असे मत काही मवाळपंथीय नेत्यांनी मांडले आहे. मोदी यांच्या विरोधात नाराजीची लाट आली, तरी शिवसेनेला काही जागा जिंकायच्या असतील; तर भाजपशिवाय पर्याय नसल्याचे या गटाचे म्हणणे आहे. 

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत जबरदस्त शक्तिप्रदर्शन करताना शिवसेनेने चांगली मते मिळवली. तरीही भाजपचा विजय झाला. या प्रचारादरम्यान भाजपेतर पक्षांनी एकत्र येण्याची हाक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली होती. त्यानंतरही धर्मनिरपेक्ष पक्षांच्या आघाडीत शिवसेनेला स्थान देणे शक्‍य नाही, अशी कॉंग्रेसची भूमिका आहे. पक्षाचे प्रवक्ते अभिषेक मनू संघवी यांनी याबाबत मुंबईत स्पष्ट केले होते. याकडे शिवसेनेतील भाजपबाबत सॉप्ट कार्नर असलेल्या गटाने पक्ष नेतृत्वाच्या लक्षात आणून दिल्याचे समजते. 

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होणार हे उघड आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपने सातत्याने दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध करीत वेगळे लढायचे ठरले तर परस्परांची मते कापली जातील. त्यामुळे भाजपचे नुकसान होणार असले तरी शिवसेनेची खासदार संख्या जेमतेम नऊ होण्याची शक्‍यता आहे, अशी आकडेवारीही पुढे करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपला विरोध करताना, युतीतून बाहेर पडणे कितपत फायद्याचे ठरेल, असा प्रश्‍नही पुढे आला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर ही आकडेवारी सादर केल्यानंतर मात्र शिवसेनेतील महत्त्वाच्या नेत्यांना निर्णय मान्य असेल, असेही स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, यापुढे प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढवली जाईल, असे शिवसेनेने अगोदरच स्पष्ट केले आहे, अशी प्रतिक्रिया प्रवक्‍त्यांनी दिली. 

भाजप हवालदिल 
शिवसेनेचा आक्रमक पवित्रा पाहिल्यानंतर भाजप सध्या हवालदिल आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे व्यक्तिगत संबंध उत्तम असले तरी सध्या शिवसेना ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे भाजपकडून सांगण्यात येते. काही दिवसांनी संवाद सुरू होईल, अशी अपेक्षाही भाजपमधून व्यक्त करण्यात येत आहे; मात्र शिवसेनेशिवाय निवडणुकीला सामोरे जावे लागले तर ते कठीण असेल, असे एका ज्येष्ठ नेत्याने कबूल केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com