रिलायन्सचे गुजराती वीजबिल!

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 2 मार्च 2017

मुंबई - रिलायन्स एनर्जीने चक्क गुजराती भाषेत वीजबिले पाठवल्याने मुंबईतील मराठी ग्राहक चक्रावला आहे. बोरिवली परिसरात हा प्रकार उघडकीस आला. मनसेने यावर आक्षेप घेत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मुंबई - रिलायन्स एनर्जीने चक्क गुजराती भाषेत वीजबिले पाठवल्याने मुंबईतील मराठी ग्राहक चक्रावला आहे. बोरिवली परिसरात हा प्रकार उघडकीस आला. मनसेने यावर आक्षेप घेत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मनसेचे उत्तर मुंबईतील नेते व उपाध्यक्ष नयन कदम यांनी रिलायन्सचे कार्यालय गाठून गुजराती भाषेतील बिलाबाबत जाब विचारला. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असून, त्याची सुरुवात रिलायन्सने केल्याचा आरोपही या वेळी कदम यांनी केला. गुजरात किंवा चेन्नई येथे तुम्ही मराठी भाषेत वीजबिल द्याल का, असा सवाल कदम यांनी रिलायन्सच्या अधिकाऱ्यांना केला. याबाबत त्यांनी निवेदन दिले. गुजराती भाषेत बिल देण्याचा प्रकार चुकून घडला असल्यास त्यात त्वरित दुरुस्ती करा. मात्र, जाणीवपूर्वक तुम्ही भाषावाद करत असाल, तर मनसे आंदोलन करेल, असा इशाराही कदम यांनी निवेदनातून दिला आहे.

दरम्यान, व्होडाफोन कंपनीने काही मोबाईल बिले गुजराती भाषेत पाठवल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. मुंबई ते जळगाव असा प्रवास करणाऱ्या प्रवाशाला दिलेल्या रेल्वे आरक्षणाच्या तिकिटावरही गुजराती भाषेत जाहिराती छापण्यात आल्याचा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

भाषा बदलण्याचा ग्राहकांना पर्याय
रिलायन्सकडून 2005 पासून वीज ग्राहकांना मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती या चार भाषांचा पर्याय दिला जात आहे. ब्रेल लिपीतही ग्राहकांना वीजबिल दिले जाते. टोल फ्री कॉल सेंटर, ग्राहक सेवा केंद्र आणि मोबाईल ऍप आदींद्वारे ग्राहकांना भाषा बदलण्याचे पर्याय आहेत, अशी माहिती रिलायन्स एनर्जीतर्फे देण्यात आली.

Web Title: reliance electricity bill in gujrathi language