टाटाकडे गेलेले वीजग्राहक पुन्हा रिलायन्सकडे वळले

टाटाकडे गेलेले वीजग्राहक पुन्हा रिलायन्सकडे वळले

महिनाभरात तीन हजार जणांची घरवापसी
मुंबई - रिलायन्सची एकेकाळी साथ सोडलेल्या वीज ग्राहकांनी काही वर्षांपूर्वी टाटा पॉवरचा पर्याय स्वीकारला खरा; पण आता याच ग्राहकांनी पुन्हा रिलायन्सची घरवापसीची वाट धरली आहे. नोव्हेंबरमध्ये राज्य वीज नियामक आयोगाने नवी वीजदरवाढ जाहीर केली. रिलायन्सचे घसरलेले विजेचे दर पाहता आता रिलायन्सच्या यंत्रणेतून बाहेर पडलेले ग्राहक पुन्हा रिलायन्सकडे येण्यास सुरुवात झाली आहे. अवघ्या एका महिन्यात अडीच ते तीन हजार वीजग्राहक पुन्हा रिलायन्सकडे आले आहेत.

रिलायन्सकडे दररोज सरासरी 50 ते 100 अर्ज वीज जोडणीसाठी येत आहेत. त्यात मुख्यत्वे घरगुती 300 युनिटपेक्षा जास्त वीज वापरणारे ग्राहक, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. घरगुती ग्राहकांत 500 युनिटपेक्षा जास्त वीज वापरणारे 20 हजारे ग्राहक आहेत. सध्या हे ग्राहक रिलायन्सची यंत्रणा वापरत आहेत; तरीही ते प्रत्यक्ष टाटा पॉवरला वीजबिलापोटीचे (स्विचओव्हर ग्राहक) पैसे मोजत आहेत. रिलायन्स एनर्जीचा पर्याय पुन्हा स्वीकारल्याने 8 ते 20 टक्के फायदा बिलात होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रिलायन्सचे मुंबई उपनगरांत 29 लाख ग्राहक आहेत.

अशी आहे दरकपात
घरगुती ग्राहकांमध्ये 301 ते 500 युनिट वीज वापरणाऱ्यांना नव्या दरवाढीनुसार टाटाच्या नेटवर्कवर युनिटमागे 11 रुपये 2 पैसे इतका दर आकारला जात आहे, तर रिलायन्सच्या ग्राहकांसाठी 9 रुपये 9 पैसे दर जाहीर झाला आहे. 500 युनिटहून अधिक वीज वापरणाऱ्या टाटाच्या ग्राहकांना 13 रुपये 50 पैसे दर आकारण्यात येत आहे, तर रिलायन्सच्या ग्राहकांना 10 रुपये 98 पैसे दर आहे. वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांच्या दरांतही अशीच एक ते दोन रुपयांची युनिटमागील दरकपात रिलायन्सला ग्राहकांच्या घरवापसीसाठी मदतीची ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com