महापालिका निवडणुकीवर रहिवाशांचा बहिष्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

मुंबई - म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाबाबत शिवसेना-भाजप सरकारकडून केवळ आश्‍वासनेच मिळत आहेत, असा आरोप करत म्हाडा पुनर्विकास समन्वय समितीने आगामी महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसे फलकच वसाहतींबाहेर लावण्यात येणार आहेत. याबाबत म्हाडा कार्यालयाबाहेर सुरू असलेले उपोषण आणखी तीव्र करण्याचा इशाराही समितीने दिला आहे.

वांद्रे येथील खेरनगर, गांधीनगर, निर्मलनगर परिसरातील म्हाडा वसाहतींतील इमारती मोडकळीस आल्या आहेत. या इमारतींसह शहरातील 56 वसाहतींच्या पुनर्विकासाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी म्हाडा पुनर्विकास समन्वय समितीने 26 डिसेंबरपासून म्हाडा कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी हजेरी लावली. उपोषणकर्त्यांच्या मागणीबाबत संबंधित मंत्र्यांसोबत बैठकाही झाल्या. मात्र, त्यातून काहीच तोडगा न निघाल्याने रहिवासी आक्रमक झाले आहेत. महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा निर्णय जाहीर करावा, अन्यथा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

विधानसभा निवडणुकीवेळीही रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, शिवसेना-भाजप नेत्यांनी रहिवाशांना आश्‍वासन देत बहिष्काराचा निर्णय मागे घेण्यास सांगितले होते. मात्र, आश्‍वासनांची पूर्तता होत नसल्याने संतप्त रहिवाशांनी महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला. शहर आणि उपनगरातील सर्व म्हाडा वसाहतींबाहेर या निर्णयाचे फलक लावण्यात येणार आहेत, अशी माहिती समितीचे आयोजक संजय कदम यांनी सांगितले.

Web Title: Residents boycott municipal elections on