साधनसामुग्रीच्या जोरावर निवडणुकांत यश - शरद पवार 

साधनसामुग्रीच्या जोरावर निवडणुकांत यश - शरद पवार 

ठाणे - राज्यात पहिल्यांदाच निवडणुका लढविताना साधनसामुग्रीचा अधिक वापर झाला. नोटाबंदीची माहिती आधीपासून असल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांना त्यांची तजवीज करण्यात यश मिळाले. त्याच जोरावर निवडणुका लढविल्या गेल्या; पण ईव्हीएम मशीन अथवा इतर कोणत्याही घटकाला दोष न देता पराभव हा पराभव असतो, हे मान्य करून झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्यास सांगितले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथे दिली. 

येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कार्यकर्त्यांना राजकारणात यश अपयश येत असल्याने नव्या जोमाने काम करण्याचा संदेश दिला. या वेळी माजी पालकमंत्री गणेश नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक, माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, शहराध्यक्ष आनंद परांजपे आदी उपस्थित होते. 

भाजपला मिळत असलेल्या यशामध्ये त्यांनी इतर पक्षातील आयात केलेल्या उमेदवारांचा वाटा मोठा आहे. राष्ट्रवादीत कार्यरत असलेल्या अनेकांना त्यांनी आपल्याकडे वळविण्यात यश मिळविले आहे. त्यांच्याकडे गेलेली हे लोक विजयी झाले आहेत; पण त्याच वेळी त्यांच्यासोबत गेलेले हे लोक भाजपसोबत किती वेळ राहतील, याबद्दल शंका असल्याचे पवार यांनी सांगितले. 

बारामतीमधून धनगर आरक्षणाचे आंदोलन सुरू झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी तेथे येऊन भाजपचे सरकार आल्यास महिन्यात धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले होते; पण सव्वा दोन वर्षांनंतरही धनगर, मराठा, मुस्लीम आरक्षणाबाबत केवळ आश्‍वासनावर आश्‍वासन देण्याचे काम भाजप सरकार करीत असल्याची टीका त्यांनी केली. एवढेच नव्हे तर ग्रामीण भाषेत लबाडा घरचे आवतण जेवल्याशिवाय खरे मानायचे नसते, तसे भाजपचे आश्‍वासन म्हणजे लबाडाघरचे आवतण असल्याचा मिस्किल टोलाही पवार यांनी या वेळी भाजप सरकारला लगावला. 

सरकार वाचवण्यासाठी माघार 
मुंबईत महापौर निवडून आणण्यासाठी भाजपने सर्व प्रयत्न केले. अनेकांबरोबर चर्चाही केल्या; पण त्यानंतरही मुंबईत यश मिळणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली. या महापौर पदासाठी राज्यातील सरकार धोक्‍यात येण्याची शक्‍यता असल्यानेच भाजप मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीतून बाजूला झाल्याची टीका शरद पवार यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com