रेल्वे पोलजवळ चोऱ्या करणारे दोघे अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

मुंबई - कल्याण-उल्हासनगरदरम्यानच्या रेल्वे पोलजवळ उभे राहून गाडीच्या दरवाजातील प्रवाशांच्या हातावर फटका मारून मोबाईल चोरणाऱ्या दुकलीला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. अशा प्रकारे चोऱ्या करणारे अजित भरत झाडे व दीपक शंकर ठोकळ हे दोघे आता न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्याकडून एक लाख 96 हजारांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. 

तक्रारदार आठ दिवसांपूर्वी सिंहगड एक्‍स्प्रेसने दरवाजात बसून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान हातावर फटका मारून त्यांचा मोबाईल चोरण्यात आला होता. चोरीप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मध्य रेल्वेचे उपायुक्त समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, वरिष्ठ निरीक्षक दिनकर पिंगळे, पोलिस निरीक्षक माणिक साठे यांचे पथक याबाबत तपास करीत होते. आठ दिवसांपूर्वी त्यांनी वालधुनी ब्रिजजवळ सापळा रचून अजित व दीपकला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान अजितने चोरीचे मोबाईल कल्याण येथील संजय आनंदा मोरे व गौतम सीताराम सोनावणे यांना विकल्याची कबुली दिली. चोरीचे मोबाईल विकत घेतल्याबद्दल संजय व गौतम यांनाही अटक करून, त्यांच्याकडून एक लाख 96 हजारांचे 20 मोबाईल हस्तगत करण्यात आले. 

नशापूर्तीसाठी करायचे चोरी 
अजित व दीपक हे कल्याणच्या ट्रॅकजवळील झोपडपट्टीत राहतात. त्या दोघांना अमली पदार्थांचे व्यसन आहे आणि त्या व्यसनासाठी लागणारे पैसे मिळवण्यासाठी ते रात्रीच्या वेळेस अशा प्रकारे चोऱ्या करायचे. चोरीनंतर ते ट्रॅकजवळून झोपडपट्टीत पळून जायचे. त्या दोघांविरोधात चोरीचे 10 गुन्हे दाखल आहेत, असे कल्याण रेल्वे पोलिसांनी सांगितले. हे आरोपी मूडनुसार चोऱ्या करायचे आणि त्या करण्यापुरतेच ते दोघे एकत्र यायचे, असे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. 

Web Title: robbers stole near railway poles