बॉंब निकामी करणारा रोबो लवकरच मुंबईत

बॉंब निकामी करणारा रोबो लवकरच मुंबईत

पोलिसांची ताकद वाढणार; श्‍वानपथकावरील ताण होणार कमी
मुंबई - दहशतवाद्यांच्या नेहमीच रडारवर असलेल्या मुंबईला आणखी सुरक्षित ठेवण्यासाठी गृह विभागाने पावले उचलली आहेत. बॉंब निकामी करणारा बिनतारी रोबो लवकरच मुंबई पोलिसांच्या ताफ्यात दाखल होणार आहे. हा रोबो तीव्र क्षमतेचे स्फोटक शोधण्यापासून बॉंब निकामी करण्यापर्यंत सर्व कामे करणार आहे. यामुळे मुंबई पोलिसांची ताकद आणखी वाढणार आहे.

मुंबई पोलिसांचा बॉंबशोधक व नाशक (बीडीडीएस) स्वतंत्र विभाग आहे. शहरात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याच्या वेळी "बीडीडीएस' श्‍वानपथकाचा वापर करतो. कित्येकदा बॉंब ठेवल्याच्या अफवांचे निनावी फोन नियंत्रण कक्षात येतात. पोलिसांची धावपळ उडते.

घटनास्थळी गेल्यावर ती अफवा असल्याचे उघड होते. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर गृह विभागाने पोलिसांच्या शस्त्रसामग्री आधुनिकीकरणावर अधिक भर दिला. मुंबई पोलिसांकरिता अत्याधुनिक शस्त्रांसह विविध उपकरणे खरेदी करण्यात आली. याचाच एक भाग म्हणून पोलिस महासंचालक कार्यालयाने बॉंब निकामी करणारे दोन रोबो खरेदी करण्याचे ठरवले आहे. त्यातील एक रोबो मुंबई पोलिसांच्या ताफ्यात असेल. अत्याधुनिक डिजिटल वायरलेस यंत्रणाही खरेदी केली जाणार आहे. अशा प्रकारची अद्ययावत यंत्रणा जगातील काही पोलिस दलांत वापरली जाते.

अधिकाऱ्यांकरिता पूर्ण "बॉडी बॉंब सूट'ची खरेदी करण्यात येत आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे एका आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले. नियंत्रण कक्षाशी संवाद साधणाऱ्या वॉकीटॉकीही अत्याधुनिक असतील.

पोलिसांची धावपळ टळणार
बिनतारी रोबो तीव्र क्षमतेची स्फोटके शोधतो. बॉंब निकामी करतो. तो पूर्ण ऍप्लिकेशन्सवर आधारित असेल. पूर्वी बॉंबसारखे संशयास्पद स्फोटक आढळल्यास ते निकामी करण्याकरिता निर्जन स्थळ किंवा चौपाट्यांवर "बीडीडीएस'च्या अधिकाऱ्यांना जावे लागत असे. चौपाट्यांवरील गर्दी पोलिसांना अडचणीची ठरत असे. त्या ठिकाणी लवकरात लवकर पोचण्यासाठी त्यांची धांदल उडत असे. नव्याने खरेदी केलेला रोबो पोलिसांचे हे श्रम वाचविणार आहे. ऍप्लिकेशनवर आधारित असलेला हा रोबो थेट लक्ष्य ठरवून पुढील कृती करील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com