रेल्वे पुलांच्या दुरुस्तीसाठी सचिनकडून दोन कोटी 

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

तेंडुलकर यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मध्य आणि पश्‍चिम रेल्वेला प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची सूचना करणारे पत्र पाठवले आहे.

मुंबई : एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्‍वभूमीवर क्रिकेटपटू व राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकर यांनी सामाजिक जाणिवेतून रेल्वेस्थानकातील पादचारी पुलांची उभारणी व दुरुस्तीसाठी खासदार निधीतून दोन कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. 

तेंडुलकर यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मध्य आणि पश्‍चिम रेल्वेला प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची सूचना करणारे पत्र पाठवले आहे. या निधीतून पादचारी पुलांची दुरुस्ती आणि नवीन पुलांची उभारणी करावी, असे पत्रही त्यांनी रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांना पाठवले आहे.

एल्फिन्स्टन रोड स्थानकातील घटना दुर्दैवी असल्याचे नमूद करीत त्यांनी मुंबईतील नागरिकांना मिळणाऱ्या सेवेत सुधारणा करण्यासाठी हे साह्य करत असल्याचे म्हटले आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्यांनी त्यात नमूद केले आहे.