साहित्य संमेलनात इंग्लडचा पाहुणा! 

सुचिता करमरकर : सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

दीड वर्षांपासून गिरवतोय मराठीचे ऑनलाईन धडे 

दीड वर्षांपासून गिरवतोय मराठीचे ऑनलाईन धडे 

पु. भा. भावे साहित्यनगरी, डोंबिवली : साहित्य संमेलन म्हणजे मराठीचा जागर, सारस्वतांचा मेळा, असे म्हटले जाते. 90 व्या साहित्य संमेलनात चक्क एक इंग्रज, इंग्लंडचा पाहुणा जॉन गोल्टन आला. नुसता आला नाही, तर हा "फेस्टिवल' पाहून खूप आनंद झाल्याची प्रतिक्रियाही जॉनने दिली. डोंबिवलीचे रहिवासी असलेले कौशिक लेले यांच्याकडून दीड वर्षापासून जॉन मराठीचे धडे गिरवत आहे. 
लोकमान्य टिळकांकडे एका इंग्रजाने मराठी शिकण्याची इच्छा प्रकट केली होती. मात्र मराठी शिकणे अवघड आहे, असे सांगूनही त्याने शिकण्याची जिद्द कायम ठेवली होती. अशीच जिद्द जॉन गोल्टन याने दाखवत मराठी शिकण्यास सुरुवात केली. तीही नेटवरून. डोंबिवलीतील साहित्य संमेलनाला जॉन हजर झाला. मागील दीड वर्षापासून तो नेटवरून लेले यांच्याकडून मराठी शिकत आहे. मराठी लिपी, भाषा बोलण्याची कला यूट्युबच्या माध्यमातून त्यांचे उच्चार करणेही तो शिकला आहे. 2003 मध्ये तो पहिल्यांदा भारतात आला होता. त्या वेळी तो तमिळनाडूमध्ये इंग्रजीचा शिक्षक म्हणून आला होता. 2006 मध्ये जॉन राजस्थानमध्ये एका एनजीओच्या कामासाठी आला होता. तिथे तो हिंदी शिकला. हिंदीसाठी खूप पुस्तके आहेत; परंतु मराठी शिकण्यास अनेक अडचणी येत असल्याचे त्याने सांगितले. साहित्य संमेलनामुळे जॉन खूप प्रभावित झाला. येथील ग्रंथदालन पाहून त्याला आनंद झाला. जॉनला मराठीसह हिंदी, फ्रेंच व काहीशी इटालियन भाषा येते. 

लेलेंची ऑनलाईन शिकवणी 

नोकरीच्या निमित्ताने संपर्कात येणाऱ्या अमराठी व परदेशी सहकाऱ्यांना कौशिक लेले यांनी मराठी शिकवायला सुरुवात केली. कालांतराने त्यांनी ही शिकवणी ऑनलाईन सुरू केली. वर्तमान काळातील वाक्‍य रचनेपासून व्याकरणातील अनेक बारकावे ते नेटवरील आपल्या ब्लॉगमध्ये शिकवतात. मराठी शब्दांचे उच्चारण शिकवण्यासाठी ते व्हिडीओही अपलोड करतात. http://kaushiklele-learnmarathi.blogspot.com

(इंग्रजीतून मराठी शिकण्यासाठी) आणि 

http://learn-marathi-from-hindi-kaushiklele.blogspot.com

(हिंदीतून मराठी शिकण्यासाठी) असा लेले यांचा वेब ऍड्रेस आहे.