जिगरबाज महिलांना 'तनिष्का' सन्मान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

तनिष्कांना स्फूर्ती
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने "सकाळ' माध्यम समूहातर्फे दौलतबी खान, शब्बो शेख आणि नावीद निखात्राफिऊद्दीन यांना तनिष्का उपक्रमाचे मानद सदस्यत्व देण्यात आले. उपस्थित तनिष्का सदस्यांनी ऍसिड फेकल्यामुळे होरपळलेल्या या तिघींचे अनुभव ऐकले. त्यांची जिद्द आणि प्रतिकूल परिस्थितीतही ठामपणे उभे राहण्याचा निर्धार पाहिल्यावर तनिष्का सदस्यही भारावून गेल्या. त्यांच्या संस्थेसाठी खारीचा वाटा देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे काही तनिष्कांनी सांगितले. 

मुंबई - सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या मानसिक छळामुळे न खचता संबंधिताला अद्दल घडवण्यासाठी महिलांना बळ देण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यास "सकाळ माध्यम समूहा'ने घेतलेल्या पुढाकाराचे समाजाच्या विविध स्तरांतून स्वागत होत आहे. एवढ्यावरच न थांबता महिला सक्षमीकरणाचा वसा घेतलेल्या "सकाळ माध्यम समूहा'कडून समाजातीलच काही विघातक शक्तींकडून मिळालेल्या शारीरिक-मानसिक वेदनांवर फुंकर मारतानाच या पीडितांना नवे बळ देण्याचा प्रयत्नही सातत्याने होत असतो. ते करतानाच फिनिक्‍स पक्ष्याप्रमाणे नव्याने भरारी मारणाऱ्या "तनिष्कां'चे उदाहरण जगासमोर आणण्याचाही प्रयत्न असतो.

त्याचाच एक भाग म्हणून ऍसिड हल्ल्यामुळे खचून न जाता जीवन उत्कटपणे जगणाऱ्या दौलतबी खान, नावीद निखात्राफिऊद्दीन व शब्बो शेख या तीन जिगरबाज महिलांना बुधवारी "सकाळ' माध्यम समूहाच्या तनिष्का उपक्रमाचे मानद सदस्यत्व देण्यात आले.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बुधवारी "सकाळ'च्या परळ कार्यालयात हा छोटेखानी सोहळा झाला. या तिघींचे तनिष्का सदस्यांनी उत्साहाने स्वागत केले. त्यांच्याशी गप्पा मारल्या, सेल्फीही काढल्या. त्या तिघींच्या अनुभवांतून बरेच काही शिकायला मिळाले, अशी प्रतिक्रिया तनिष्कांनी व्यक्त केली. या वेळी या तिघींनी समाजात येणारे अनुभवही सांगितले.

दरम्यान, महिला सुरक्षेचे आव्हान कायम असल्याने या विषयावर काम करणाऱ्या तनिष्कांचा निर्धार कौतुकास्पद आहे, अशा शब्दांत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाचकर यांनी बुधवारी सकाळ माध्यम समूहाच्या उपक्रमाचा गौरव केला. जागतिक महिला दिनानिमित्त नवी दिल्लीतून राज्यभरातील तनिष्का सदस्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना त्या बोलत होत्या.

ऍसिड हल्ल्यानंतर समाजानेही दिले चटके... 
ऍसिड हल्ल्यानंतरच्या असह्य वेदना सहन करणाऱ्यांना समाजात अनेक पद्धतीने दुजाभावाची वागणूक दिली जाते. राहत असलेल्या वस्तीत, कार्यालयात, मदत देणाऱ्या संस्थांमध्ये, इतकेच नव्हे; तर वैद्यकीय उपचारांच्या ठिकाणीही क्षणोक्षणी हा दाहक अनुभव ऍसिड हल्ल्यात जखमी झालेल्यांना येत असतो. लोक आमच्या चेहऱ्याकडे घृणेने पाहतात, मैत्री करत नाहीत. अशा वेदना आणखी त्रासदायक असतात. म्हणूनच समाजाकडून नुसती बोलून सहानुभूती नको, माणुसकीचे नाते जपणे गरजेचे आहे, असे ऍसिड हल्ल्यामुळे खचून न जाता जीवन उत्कटपणे जगणाऱ्या दौलतबी खान सांगत होत्या. 

जागतिक महिला दिनानिमित्त दौलतबी खान, नावीद निखात्राफिऊद्दीन व शब्बो शेख यांना बुधवारी "सकाळ' माध्यम समूहाच्या तनिष्का उपक्रमाचे मानद सदस्यत्व देण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. 

सरकारी रुग्णालयात उपचारांच्या वेळी देण्यात आलेली वाईट वागणूक विसरता येणार नाही, असे दौलतबी म्हणाल्या. आम्हाला एखादा भयंकर आजार असल्यासारखी वागणूक दिली जाते. आम्ही राहतो त्या वस्तीतच "मॉडेल बन गयी है' अशी हेटाळणीही केली जाते, अशी खंत दौलतबी यांनी व्यक्त केली. अनेकदा यातून हाणामारीच्या घटनाही घडतात. ऐनथंडीत पहाटेची अंघोळ, ड्रेसिंगदरम्यान जळणारी त्वचा, ड्रेसिंग रूममध्ये झालेल्या दोन शस्त्रक्रिया असा अंगावर सरसरून काटा आणणारा अनुभव त्यांनी या वेळी सांगितला. औषधे घेण्यासाठी लावावी लागणारी रांग आणि त्या वेळी होणारा त्रास सांगताना त्यांचा कंठ दाटून आला. खासगी रुग्णालयांत रुग्णांची अधिक काळजी घेतली जाते, म्हणूनच ऍसिड हल्ल्यातील जखमींना खासगी रुग्णालयांत उपचार मिळाले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ऍसिड फेकण्यासारखा गंभीर गुन्हा करूनही गुन्हेगार काही महिन्यांतच सुटून जातो आणि पुन्हा समोर उभा राहून धमकावू लागतो. काहीही दोष नसताना आम्हाला हे सहन करावे लागते. त्यामुळे अशा गुन्ह्यांसाठी कडक शिक्षा होण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या. 

वयाच्या पाचव्या वर्षापासून ऍसिड हल्ल्याच्या वेदना सहन करणाऱ्या शब्बो शेख हिने अनाथाश्रम, शालेय जीवन, कॉलेजमधील शिक्षणापर्यंतचे अनुभव सांगितले. अनाथाश्रमातील मुले दूर राहत असत. बोलणे, खेळणे बंद झाले होते. कॉलेजमध्येही तसेच घडले. बऱ्याच कालावधीनंतर काही ना काही स्वार्थामुळे समाजातील काही जणांनी उशिरा का होईना आम्हाला स्वीकारले. खासगी कंपन्यांनी विद्रूप चेहऱ्याची सबब पुढे करत नोकरी नाकारली. मिळालेली नोकरी सोडावी लागली. घराचा आसराही सुटला, असा जळजळीत अनुभव शब्बोने सांगितला. क्षमता असतानाही अनेक ठिकाणी नोकरीत नाकारले जाते, असे सांगताना तिच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. शैक्षणिक पात्रता असतानाही अनेक ठिकाणी आमच्यासारख्यांना कमी पगार दिला जातो, अशी खंतही तिने व्यक्त केली. उपचारांसाठी घ्यावी लागणारी सुट्टी देताना माणुसकीच्या दृष्टीने विचार केला पाहिजे, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली. 

त्वचेवरील उपचार खूपच महागडे असतात, पण पैशांसाठी कुणासमोर हात पसरायचे नाहीत, सन्मानाने जगायचे असे आम्ही ठरवले आहे. त्यातूनच आम्ही "ऍसिड सर्व्हायव्हर्स साहस फाऊंडेशन' ही संस्था स्थापन केली आहे, अशी माहिती संस्थेच्या उपाध्यक्ष नावीद निखात्राफिऊद्दीन यांनी दिली. कुणी मदत करील, डोनेशन देईल याची आम्ही आता वाट पाहत नाही. लोकांकडून छोटी छोटी मदत जमवून पुनर्वसन केंद्र उभारण्याचा आमचा मानस आहे. आमचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वसामान्यांच्या दातृत्वातून मिळणाऱ्या पैशांतून गरजू व्यक्तीला थेट निधी मिळू लागेल अशी अपेक्षा आहे. या पैशांतून ऍसिड सर्व्हायव्हरवर उपचार करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करता येतील असे त्या म्हणाल्या. 

तनिष्कांना स्फूर्ती
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने "सकाळ' माध्यम समूहातर्फे दौलतबी खान, शब्बो शेख आणि नावीद निखात्राफिऊद्दीन यांना तनिष्का उपक्रमाचे मानद सदस्यत्व देण्यात आले. उपस्थित तनिष्का सदस्यांनी ऍसिड फेकल्यामुळे होरपळलेल्या या तिघींचे अनुभव ऐकले. त्यांची जिद्द आणि प्रतिकूल परिस्थितीतही ठामपणे उभे राहण्याचा निर्धार पाहिल्यावर तनिष्का सदस्यही भारावून गेल्या. त्यांच्या संस्थेसाठी खारीचा वाटा देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे काही तनिष्कांनी सांगितले.