तांदळाची रिकामी पोती विका आणि हिशोब द्या!

तांदळाची रिकामी पोती विका आणि हिशोब द्या!

मोखाडा (पालघर) : जिल्हा परीषद शाळाना मिळणाऱ्या पोषण आहारातील तांदूळ ज्या पोत्यात दिला जातो ती पोती विका आणि त्याचे पैसे तात्काळ जमा करा असा आदेश शिक्षक संचालकांनी काढला आहे. त्या संदर्भाने पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्याना हा आदेश जिल्हा गटशिक्षणाधिकारी यांनी काढला आहे मात्र हा हिशोब सन सन  2012 ते  2018  पर्यंत द्यावयाचा आदेश असल्याने आता गेल्या पाच वर्षांपुर्वीची पोती शोधायची कुठे असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. एन सुट्टीच्या काळात शिक्षकांना पोती शोधण्याचे काम करावे लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.  

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत तांदळाच्या रिकाम्या पोत्यांची विक्री करून प्राप्त होणारी रक्कम चलनाने शासनास जमा करण्याचा आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून शाळांना प्राप्त झाला आहे. या निर्णया विरुद्ध तीव्र पडसाद शिक्षकांमध्ये उमटले असून नाराजी व्यक्त होत आहे.

सर्व शिक्षा अभियानातून शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि अनुदानित माध्यमिक शाळांमधील पहिली ते आठवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनात खिचडी दिली जाते. या करिता येणारे तांदूळ पोत्यातून शाळेपर्यंत पोहचतात. 2012 ते 2018 या काळातील तांदळांची पोती विकून आलेला पैसा शासन दरबारी जमा करण्याचे फर्मानच शिक्षण संचालक  यांच्या संदर्भातुन गटशिक्षणाधिकारी पालघर यांनी जिल्हयातील शाळांना बजावले आहे. परंतु चालू शैक्षणिक वर्ष वगळता उर्वरित पाच वर्षातील पोत्यांचे पैसे कसे अदा करायचे असा प्रश्न  शिक्षकांसमोर उपस्थित झाला आहे. 

पालघर जिल्ह्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडतो. जून ते ऑगस्ट या महिन्यात पावसाचे प्रमाणही अधिक असते. या काळात वर्गखोल्यांची लादी ओली होते. शिवाय विद्यार्थ्यांची बसायच्या बेंच-डेस्कवरही ओलावा येतो.  ते पुसण्याकरिता सर्रास पोत्यांचा वापर केला जातो. शिवाय दमटपणा वाढल्याने जमा केलेल्या पोत्यांना बुरशी लागून ती कुजून खराब होतात. दरम्यान, खेडोपाडी सह , केंद्र व तालुका शाळांमध्ये अडगळ ठेवण्यासाठी गोदामाची व्यवस्था नाही. महत्वाची बाब म्हणजे पोती खरेदी करण्याचे दर वेगवेगळ्या भागात भिन्न असल्याने भ्रष्टाचाराचे आरोप टाळण्याकरिता बहुतेक शाळांकडून त्यांची विक्रीच केली जात नसल्याची मतं शिक्षकांनी मांडली आहेत.

दरम्यान या निर्णयामुळे सहा वर्षांतील रिकामी पोती आणि ती विकून आलेल्या पैशांचा हिशोब शाळेला द्यावा लागणार आहे. त्या मुळे विकले न गेलेल्या पोत्यांचे  पैसे आणायचे कुठून या समस्येने शिक्षकांना ग्रासले आहे. तथापि  मनस्ताप देणाऱ्या या निर्णया विरोधात शिक्षकांनी तिव्र संताप व्यक्त केला आहे. .

शिक्षकाचा झाला बहुरूपी? 
अध्यापनाचे काम करणारा शिक्षक गुरुजनाला शासनाने बहुरूपी बनविल्याचे भावना व्यक्त होत असून  सर्वात आधी शासनाने शिक्षकाला बांधकाम करणारा ठेकेदार बनविले, विध्यार्थ्यांसह सेल्फी काढण्यासाठी फोटोग्राफर बनवले,  माणस मोजायला लावली मतदार नोंदवायला लावले मतदान अधिकरी केले  बाजारातील वस्तू खरेदी करायला लावली , लोकांचे आधार कार्ड, बँक खाती उघडून देणारा क्लार्क तर आचारीही  बनवलेच होते मात्र आता चक्क बारदानवालाच केलं आहे.यामुळे शिक्षकांत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com