'सावरकरांच्या विचारांची देशाला नितांत गरज'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

ठाणे - ज्वलंत देशभक्ती आणि सावरकरांच्या विचारांची देशाला नितांत गरज आहे, असे मत अभिनेते शरद पोंक्षे यांनी येथे व्यक्त केले.

ठाणे - ज्वलंत देशभक्ती आणि सावरकरांच्या विचारांची देशाला नितांत गरज आहे, असे मत अभिनेते शरद पोंक्षे यांनी येथे व्यक्त केले.

ठाण्यातील २९ व्या अखिल भारतीय स्वा. सावरकर साहित्य संमेलनातील ‘महाकवी सावरकर’ कार्यक्रमात पोंक्षे यांनी निरूपण करताना सांगितले की, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वा. सावरकर जन्माला यावेत, असे आपल्याला वाटते; मात्र त्याआधी त्यांना जन्म देणाऱ्या जिजाऊ जन्माला येण्याची गरज आहे. आपण आपल्या पाल्यांना राष्ट्र आणि धर्म याबाबतची शिकवण द्यायला हवी. आज मशाली पेटवण्याची वेळ असताना लोक मेणबत्त्या पेटवत आहेत, ही खरी शोकांतिका आहे. नखे असणारा वाघ तुमच्यावर हल्ला करण्यासाठी पुढे येतो, तेव्हा त्याला बंदूक दाखवूनच शमवावे लागते; मात्र परिस्थिती निर्माण झाल्यावर क्रांतिकारक आपोआप निर्माण होतील, असा आशावादही पोंक्षे यांनी व्यक्त केला. 

म्हातारी मेल्याचे दु:ख नाही; मात्र काळ सोकावतोय. भारतरत्नांबाबत पुढची पिढी जेव्हा वाचेल, तेव्हा त्यांना राजीव गांधी तसेच ज्यांचा या देशाशी संबंध नाही अशा नेल्सन मंडेलांचे नाव दिसेल; मात्र देशासाठी जन्मठेपेची शिक्षा भोगलेल्या स्वा. सावरकरांचे नाव दिसणार नाही, याची खंत आहे. ज्या दिवशी सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळेल, त्या दिवशी त्या पुरस्काराचाही सन्मान होईल, असे पोंक्षे यांनी सांगितले.