'ऑगस्टा'विषयी सावंत यांचे आरोप नैराश्‍यातून - भांडारी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 9 मे 2017

मुंबई - राज्य सरकारने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी हेलिकॉप्टर भाड्याने घेण्यासाठी केवळ एजन्सीची

मुंबई - राज्य सरकारने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी हेलिकॉप्टर भाड्याने घेण्यासाठी केवळ एजन्सीची
नियुक्ती केली आहे. भाड्याने कोणत्या कंपनीचे हेलिकॉप्टर घ्यायचे, याचा कुठलाही उल्लेख शासन आदेशामध्ये नसताना अतिशय बेताल, वायफळ आणि नैराश्‍यातून कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आरोप करीत असल्याचे प्रत्युत्तर महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी दिले आहे.

भांडारी यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारने ई-टेडरिंगच्या माध्यमातून ज्या "ऍडोनीस' आणि "ऍलॉफ्ट' या दोन संस्थांची नेमणूक केली, त्यांचा आणि "ऑगस्टा वेस्टलॅंड'चा काहीही संबंध नाही. सचिन सावंत यांनी आरोप करताना संपूर्ण अभ्यास करायला हवा होता. पण, त्यांनी तो केलेला दिसून येत नाही. सुरक्षेसाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना दुहेरी इंजिन असलेले हेलिकॉप्टर वापरण्याचा नियम आहे. 1981 पासून त्याची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होते. दुहेरी इंजिन असलेल्या हेलिकॉप्टरची निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत आणि नियुक्त एजन्सीने कोणत्या कंपनीचे हेलिकॉप्टर वापरायचे, यासंबंधी त्यांना कोणत्याही सूचना नाहीत.

'ऑगस्टा वेस्टलॅंड'चे भूत कॉंग्रेसच्या विस्मरणातून अजूनही जात नाही. या प्रकरणाची पाळेमुळे इटलीतून पुढे आली, तेही सचिन सावंत यांनी विसरू नये. कुणाला लाच मिळाल्याचा आरोप झाला, हेही त्यांना चांगलेच ठाऊक आहे. मुळात शासन आदेशामध्ये कुठेही कोणत्याही कंपनीचा उल्लेख नसताना कॉंग्रेसला केवळ "ऑगस्टा वेस्टलॅंड' का दिसते, हा मोठाच प्रश्न आहे. राज्य सरकारने या संदर्भात जारी केलेला आदेश अतिशय स्पष्ट आणि कोणालाही नागरिकाला पाहण्यासाठी सरकारच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे,'' असेही भांडारी यांनी म्हटले आहे.