भिवंडी पालिकेची सुरक्षा धोक्‍यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

भिवंडी पालिकेचे सुरक्षा रक्षक विविध तीन प्रहरात काम करत आहेत. ते नियमानुसार काम करीत नसतील, तर चौकशी करून कारवाई केली जाईल. 
- विनोद शिंगटे, उपायुक्त, भिवंडी

भिवंडी - भिवंडी महापालिकेने सुरक्षा विभाग कार्यालयाद्वारे विविध कार्यालय व वास्तूंच्या सुरक्षेसाठी २३ सुरक्षारक्षक नेमले आहेत. त्यावर महापालिका प्रशासन दरमहा लाखो खर्च करीत आहे. प्रत्यक्षात जागेवर चार ते पाच सुरक्षारक्षक दिसतात. त्यामुळे पालिका सुरक्षा ‘रामभरोसे’ असल्याने या प्रकरणी आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी लक्ष घालावे, अशी मागणी महिला कर्मचाऱ्यांनी केली आहे. 

महापालिका आयुक्तांनी सुरक्षारक्षक मंडळ मुंबई कल्याण शाखेद्वारे २३ सुरक्षा कर्मचाऱ्यांची ठेकेदारातर्फे नियुक्ती केली आहे. त्यासाठी दरमहा चार लाखांचा खर्च केला जातो; मात्र सुरक्षा रक्षक विभाग कार्यालयाकडून योग्यरीत्या कामकाज होत नसल्यामुळे पालिकेची सुरक्षा धोक्‍यात आली आहे. कार्यालयात घुसून अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की यांसारखे प्रकार घडत आहेत. सुरक्षारक्षकांच्या बेपर्वा कारभाराबाबत पोलिसांनीही आयुक्तांना अहवाल दिला आहे. 

पालिकेच्या आवारात बेकायदा खासगी वाहने उभी केली जात आहेत. गतवर्षी एका व्यक्तीने रात्री पालिकेच्या इमारतीत प्रवेश करून सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. दोन महिन्यांपूर्वी पालिकेच्या जनरेटर विभागातून पाच बॅटऱ्या चोरीला गेल्या होत्या. तेव्हाही सुरक्षारक्षकाची हलगर्जी उघड झाली होती. सुरक्षा रक्षकांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी रवींद्र गायकवाड या कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे प्रभाग समिती ३ चाही कार्यभार असल्याने त्यांना पुरेसे लक्ष देणे कठीण जात आहे.

Web Title: Security of Bhiwandi municipal danger