‘सेल्फ फायनान्स’ला पसंती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

मुंबई - मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया २ जूनपासून सुरू झाली आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत २ लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे नाव नोंदणी केली असून, विविध अभ्यासक्रमांसाठी ७ लाख ६ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांनी सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांना पसंती दिली आहे. 

बारावी निकालानंतर विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना १२ तारखेला गुणपत्रिका मिळणार असल्याने विद्यापीठाने प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल करत १८ जूनपर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्यास मुदत दिली आहे. आजपर्यंत २ लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे प्रवेशासाठी नाव नोंदणी करत कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांमधील विविध अभ्यासक्रमांसाठी ७ लाख ६ हजार अर्ज भरले आहेत. वाणिज्य शाखेसाठी २ लाख २४ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. वाणिज्य शाखेतील सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांनाही विद्यार्थ्यांनी मोठी पसंती दर्शविली आहे. यामध्ये अकाऊंटिंग ॲण्ड फायनान्स या अभ्यासक्रमासाठी ७१ हजार ३३३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. बॅंकिंग आणि विमा या विषयाला २४ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. यासह विविध अभ्यासक्रमांनाही विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कला आणि विज्ञान शाखेच्या सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांनाही विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या तुलनेत वाणिज्य शाखेतील अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी सर्वाधिक अर्ज केले आहेत. मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि विद्यार्थ्यांसाठी सोईची आहे.

विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन 
अर्ज भरताना अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी ८४११८६०००४ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा; तसेच नोंदणी प्रक्रिया समजावी यासाठी व्हिडीओ आणि ऑनलाईन चॅट सपोर्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. लीलाधर बन्सोड यांनी सांगितले.

Web Title: self finance for education student