भायखळ्यात प्राणिसंग्रहालयातील सेल्फी पॉईंट गोत्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

मुंबई - भायखळ्यातील जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील सेल्फी पॉईंट गोत्यात येण्याची शक्‍यता आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने उद्यानाला नोटीस पाठवून त्याबाबत अहवाल मागवला आहे.

मुंबई - भायखळ्यातील जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील सेल्फी पॉईंट गोत्यात येण्याची शक्‍यता आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने उद्यानाला नोटीस पाठवून त्याबाबत अहवाल मागवला आहे.

जिजामाता उद्यान अर्थात राणीच्या बागेतील प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण करण्यात येणार असून, त्यात सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. ‘पॉझ’ संस्थेने सेल्फी पॉईंटवर आक्षेप घेत केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला पत्र लिहिले होते. सेल्फी पॉईंटवर नागरिकांची गर्दी होत असल्याने प्राण्यांना त्रास होण्याची शक्‍यता ‘पॉझ’ने व्यक्त केली होती. त्या पत्रानंतर केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने प्राणिसंग्रहालयाला नोटीस पाठवून त्याबाबत तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

वाद संपत नाहीत
पालिका प्राणिसंग्रहालयाचा विकास करत आहे. परदेशी पेंग्विन प्राणिसंग्रहालयात दाखल झाले आहेत. वर्षभरात वाघ, सिंह, बिबट्या आदी प्राणी येणार आहेत. पर्यावरणप्रेमी आणि प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या आक्षेपामुळे त्याचा प्रकल्प अनेक वर्षे रखडला आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या पेंग्विनच्या मृत्यूमुळे प्राणिसंग्रहालय प्रशासन वादात अडकले होते. आता पुन्हा सेल्फी पॉईंटवरून नवा वाद सुरू होण्याची शक्‍यता आहे.