संभाव्य 'युती'मुळे गोव्यात शिवसेना वाऱ्यावर

संभाव्य 'युती'मुळे गोव्यात शिवसेना वाऱ्यावर

मुंबई - गेल्या काही दिवसांतील राजकिय समीकरणांमुळे गोव्यातील राजकीय धुमशानात वाजतगाजत दाखल झालेली शिवसेना वाऱ्यावर पडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व शिवसेनेचा मित्रपक्ष (भाजपचा शत्रु पक्ष) असलेल्या राज्य सुरक्षा मंच यांच्यातील संभाव्य युतीमुळे गोव्यातील राजकीय पटलावर यशाचे खाते उघडण्याची मनिषा बाळगणाऱ्या शिवसेनेचे निवडणुकीआधीच धाबे दणाणले आहेत.

गोव्यातील यावेळच्या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात इतर सर्व असे सर्वसाधारण चित्र आहे. भाजपची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील बंडखोरांच्या राज्य सुरक्षा मंच या नव्या राजकीय पक्षाने गेल्या सहा महिन्यांपासून गोव्यातील राजकारण ढवळून काढले आहे. महाराष्ट्रात मराठी अस्मितेचे राजकरण करणाऱ्या शिवसेनेने गोव्यातील भाषेचा मुद्दा छेडणाऱ्या या पक्षाकडे सुरूवातीलाच मैत्रीचा हात पुढे केला होता. राज्य सुरक्षा मंचने या प्रस्तावाला तत्काळ चांगला प्रतिसादही दिला होता. परंतु, गेल्या आठ दिवसांत घडलेल्या राजकीय घडामोडींनी गोव्यातील राजकीय चित्र काहीसे बदलले आहे. सत्ताधारी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या मंत्र्यांची भाजपने हकालपट्टी केल्याने 'मगोप'ने भाजप विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. 

त्यातच राज्य सुरक्षा मंच या नव्या पक्षाची नोंदणी जरी झाली असली तरी त्यांना अजुन निवडणुक चिन्ह मिळालेले नसून लवकर मिळण्याची शक्‍यताही नाही. त्यामुळे भाजपचा पाडाव हा एकच उद्देश असलेले मगो पक्ष व रासु मंच हे पक्ष एकत्र आले आहेत. वेगवेगळे लढून मतांमध्ये विभागणी करण्यापेक्षा एकत्र लढून यश मिळवू, या विचारावर या दोन पक्षांचे एकमत झाले आहे.

अगोदरच मगोपने किमान 25 जागा लढवणार असल्याचे जाहीर केले असल्याने उर्वरित पंधरा जागाच रासु मंचच्या वाटयाला येणार आहेत. त्यातच आता राज्यात ताकद नसलेल्या शिवसेनेला काय द्यायचे, असा पेच निर्माण झाला आहे. या राजकीय कोंडीमुळे गोमंतकात वाजतगाजत प्रवेश करणाऱ्या शिवसेनेचे धाबे मात्र दणाणले आहेत. कारण गेली कित्येक वर्षे शिवसेनेचे अस्तित्व जरी गोव्यात असले तरी येथील राजकारण गंभीरतेने न घेण्याच्या शिवसेना नेत्यांच्या खोडीमुळे शिवसेना कधी येथे रूजलीच नाही.

मुंबई दिल्लीतील वचपा काढण्यासाठीच शिवसेनेचा गोमंतकात प्रवेश
गेल्या दोन- तीन वर्षांपासून मुंबई व दिल्लीतील राजकीय परिस्थिती खूप बदलली आहे. महाराष्ट्रात कायम छोटा भाऊ म्हणून वावरणाऱ्या भाजपने वाघावरच कधी गुरगुरायला सुरुवात केली हे शिवसेनेला देखिल कळले नाही. त्यातच दिल्लीतही एकहाती सत्ता येऊन नमोयुग सुरु झाल्याने सर्वात जुना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सतत अवहेलनेचा सामना करावा लागतो आहे. त्यातच मुंबई महापालिका सर करण्याच्या गोष्टी भाजपकडून बोलल्या जात आहेत. या सगळ्याचा वचपा काढण्यासाठीच शिवसेना गोमंतकात आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे.

शिवसेना गोव्यात किमान पाच जागा लढवणार असून सध्याच्या राजकीय जुळवाजुळवीमुळे आम्हाला काही फरक पडत नाही. राज्य सुरक्षा मंचच्या सुभाष वेंलिगकर यांच्यावर आमचा पुर्ण विश्‍वास असून येत्या गोव्याच्या विधानसभेत शिवसेनेच्या वाघाची डरकाळी नक्की घुमेल.
- संजय राऊत,
शिवसेना खासदार व गोवा संपर्क नेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com