विधवा महिलेला "समृद्धी'साठी दमबाजी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

शहापूर (जि. ठाणे) - समृद्धी महामार्गाला जमीन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी विधवा महिलेवर दमबाजी करत संमतीपत्र घेतले होते. संबंधित महिलेच्या परदेशात राहणाऱ्या मुलींनी या प्रकाराविरोधात भारतीय दूतावासाकडे तक्रार करण्याचा इशारा दिल्याने या अधिकाऱ्यांनी ते संमतीपत्र चक्क फाडून टाकले. याविरोधात शहापूर तालुक्‍यातील शेतकरी महिलेने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन संरक्षणाची मागणी केली आहे.

वाशाळा ग्रामपंचायत हद्दीतील गट क्र. 381 मधील शेतजमीन विशाखा धानके व त्यांच्या परदेशात राहणाऱ्या मुली रिमा पवार, रश्‍मी म्हात्रे यांच्या नावावर आहे. या जमिनींना कूळ नसल्याने ही जमीन ही लागवडीसाठी आदिवासी मजुरांना मजुरी देऊन गेल्या अनेक वर्षांपासून कसण्यात येत आहे. विशाखा धानके यांचे पती विनायक धानके यांचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले. या जमिनीला "समृद्धी'मुळे चांगली किंमत मिळणार असल्याचे समजताच प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांनी तेथील आदिवासी ग्रामस्थांना हाताशी धरीत या जमिनीवर कूळ लावण्याचा प्रयत्न सुरू केला होता. या संदर्भात विशाखा धानके यांनी कसारा पोलिस ठाण्यात 8 जुलै रोजी तक्रार दाखल केली होती.