शिवसेना हा तर दलालांचा पक्ष! 

sanjay-nirupam
sanjay-nirupam

मुंबई - शिवसेना हा दलालांचा पक्ष आहे. त्यांचा प्रत्येक नगरसेवक, शाखाप्रमुख हप्ते खातो. शिवजयंतीच काय, पण गणेशोत्सवाच्या नावावरही हप्ते वसुलीचा यांचा धंदा आहे. या महाभ्रष्ट पार्टीच्या प्रत्येक नगरसेवकाच्या विभागातील प्रत्येक कामात कमिशन गोळा केले जाते, असे जळजळीत आरोप मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केले. "सकाळ'च्या कार्यालयात "कॉफी विथ सकाळ' या उपक्रमात शुक्रवारी त्यांनी महापालिकेतील भ्रष्टाचारावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी शिवसेनेबरोबर भाजपलाही फैलावर घेतले. 

महापालिकेतील भ्रष्टाचारावर तोफ डागतानाच, शिवसेना-भाजप मुंबईचा विकास करण्यात अपयशी ठरल्याचा सणसणीत आरोप त्यांनी केला. निरुपम म्हणाले की, दरवर्षी पावसाळ्यात मुंबई ठप्प होते. रुग्णालयात रुग्णांना जमिनीवर झोपावे लागते. रस्तेदुरुस्तीवर हजारो कोटींचा खर्च होतो, पण खड्डे कायम असतात. त्यांनी पाणी माफियाही पोसले आहेत. नवा रस्ता बनवण्यासाठी येणाऱ्या खर्चापेक्षा पालिका रस्ते दुरुस्तीवर जास्त खर्च करते. तीही निकृष्ट दर्जाची असते. यासाठी कंत्राटदारांची लॉबी काम करत आहे. याला फक्त शिवसेनाच जबाबदार नाही, तर भाजपही आहे. दोन्ही पक्ष मुंबईचा विकास करण्यात निक्कमे ठरले आहेत, अशी टीका निरूपम यांनी केली. 

पहिल्यांदाच निवडून आलेला युतीचा नगरसेवकही अडीच वर्षांत महागडी गाडी घेतो. एका झोपडीतून अनेक आलिशान घरांत जातो. विभागातील प्रत्येक कामात त्यांचे कमिशन असते. शिवसेनेचे शाखाप्रमुख व नगरसेवक गणपती, शिवजयंतीच्या नावाखाली हप्तेखोरी करतात, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. 

वेगळे लढले तरी लक्ष्य करणार 

महापालिकेतील भ्रष्टाचाराची मुख्यमंत्र्यांनीच एका अर्थाने कबुली दिली आहे. त्यात भाजपही सहभागी आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तेचे वाटप झाले आहे. या भ्रष्टाचारातून भाजप बाजूला नाही. दोघांनीही मुंबईचे वाटोळे केले आहे. हे दोन्ही पक्ष महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढले तरी या पक्षांना आम्ही यावरून लक्ष्य करणार आहोत, असे निरुपम यांनी सांगितले. 

स्वतंत्र लढणेच योग्य 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबईत अस्तित्वच नाही, हे त्यांचे नेतेही खासगीत कबूल करतात. राष्ट्रवादीशी युती करू नये, असे मुंबईतील सर्व कॉंग्रेस नेत्यांचे मत आहे. त्यांचे अस्तित्व असलेल्या काही जागांबाबत विचार करता आला असता; पण कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाली तर शिवसेना-भाजपचाच फायदा होईल. त्यामुळे स्वतंत्र लढलेले बरे, असे मत निरुपम यांनी मांडले. 

नागरिक रस्त्यावर उतरतील 
नोटाबंदीनंतर बॅंक खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा रद्द केली नाही तर नागरिक रस्त्यावर उतरतील. नोटाबंदी ही फसलेली योजना आहे. पैसे काढण्याची मर्यादा देशाच्या कायद्याविरोधात आहे. यातून काळा पैसा बाहेर आलाच नाही, उलट आता तर दहशतवाद्यांकडेही नव्या नोटा सापडत आहेत. मोदींचे सर्व दावे फोल ठरले आहेत, असे निरुपम म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com