कल्याणमधील सिटी पार्कवरून कलगीतुरा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

कल्याण - स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण पश्‍चिमेतील गौरीपाडा परिसरात उभारण्यात येणाऱ्या सिटी पार्क प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या श्रेयावरून शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगण्याची दाट शक्‍यता आहे. गौरीपाडा येथील भाजपचे स्थानिक नगरसेवक दया गायकवाड यांनी या प्रकल्पाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावे, अशी मागणी केली असल्याने सिटी पार्क प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजप पुन्हा आमनेसामने येण्याची शक्‍यता आहे. 

गौरीपाडा येथील आरक्षित भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी सुमारे 100 कोटी खर्च अपेक्षित आहे. यापैकी 70 कोटी निधीची निविदा मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप या दोनही पक्षांना सिटी पार्कच्या भूमिपूजन सोहळ्याचे वेध लागले आहे. सिटी पार्कची संकल्पना शिवसेनेची आहे; मात्र हा प्रकल्प स्मार्ट सिटी अंतर्गत साकारण्यात येणार आहे. स्मार्ट सिटीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी निधी दिल्यामुळे या प्रकल्पाचे भूमिपूजन त्यांच्याच हस्ते झाले पाहिजे, असे मत गायकवाड यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात गायकवाड यांनी थेट फडणवीस यांनाच पत्र पाठवले आहे. 

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही वारंवार सिटी पार्कच्या भूमिपूजनाचा उल्लेख करत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेच भूमिपूजन होणार असल्याचे संकेत दिले आहे. एकीकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना आणि भाजप युतीत सत्तेचा उपभोग घेत असून, पालघर पोटनिवडणुकीमध्ये हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले असल्याने भविष्यात शिवसेना-भाजपमधील तणाव आणखी वाढणार आहे. माणकोली उड्डाणपुलाच्या भूमिपूजनावरून शिवसेना-भाजपमध्ये झालेली रस्सीखेच मनोरंजनाचा विषय झाला होता. आता सिटी पार्क प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यातही अनेक नाट्यमय घडामोडी घडणार असल्याचे चित्र आहे. 

सरकारकडून निधी प्राप्त होतो, तेव्हा त्यांचे प्रतिनिधी प्रोटोकॉलनुसार आमंत्रण देऊन भूमिपूजनाचा कार्यक्रम करतात. तसे घडले नाही, तर आम्ही वाट न बघता भूमिपूजन सोहळा करू. 
- गोपळ लांडगे, कल्याण जिल्हा प्रमुख, शिवसेना 

Web Title: Shiv Sena and BJP fight for smart city in kalyan