सोशल मीडियावर शिवसेना आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

मुंबई : आघाडीत बिघाडी आणि युतीचा काडीमोड झाल्यानंतर स्थानिक निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियावर शिवसेनेने आज आघाडी घेतली.

मुंबई : आघाडीत बिघाडी आणि युतीचा काडीमोड झाल्यानंतर स्थानिक निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियावर शिवसेनेने आज आघाडी घेतली.

राज्यातील मुंबईसह दहा महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत असताना शिवसेना भाजपची युतीची तुटली. त्यामुळे या संपूर्ण निवडणुका शिवसेना भाजपच्या वाक्‌युद्धाने गाजणार आहेत. निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियाचा प्रभाव असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी त्याचा अवलंब केला आहे. यात शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात पोस्ट टाकण्यास सुरवात केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 26 जानेवारीच्या भाषणाला 67 तर 28 जानेवारीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाला फक्‍त 33 टक्‍के लोकांनी पसंती दर्शविल्याचा दावा शिवसेनेने ट्विटरवरून केला आहे. त्याचबरोबर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणाच्या व्हिडिओ क्‍लिप शिवसेनेने व्हॉट्‌सऍप आणि फेसबुकवर टाकून धमाल उडवून दिली आहे. त्याच्या सोबतीलाच भाजपच्या एका कार्यक्रमात भाजप नगरसेविका शिरवाडकर व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेवून उभ्या असल्याचे फोटो टाकून "हिच का भाजपची संस्कृती', असा सवाल शिवसेनेने केला आहे.