अख्ख्या महाराष्ट्राला भिकारी बनवेन- शिवसेना आमदार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आक्षेपार्ह विधान केल्याचे भाजप पुरस्कृत सोलापूरचे आमदार प्रशांत परिचारक यांचे उदाहरण ताजे असतानाच शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार प्रा. तानाजी सावंतही अशाच मुद्द्यावर विधिमंडळात अडचणीत आले आहेत. त्यामुळे सध्या परिचारकांविरोधात रान उभे केलेल्या शिवसेनेपुढे धर्मसंकट उभे ठाकले आहे. हे दोघेही जण विधान परिषदेचे सदस्य असल्याने विधान परिषदेतील विरोधकांना त्यानिमित्ताने आयताच मुद्दा मिळण्याची शक्‍यता आहे. 

नुकत्याच पार पडलेल्या महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत सैनिकांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक अडचणीत आले आहेत. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात गेले तीन दिवस याच मुद्द्यावर विरोधकांनी रान पेटविले आहे. परिचारक यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या मागणीवर शिवसेनेसह सर्व विरोधक एकवटले आहेत. अशातच नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तानाजी सावंत यांनीही अशाच प्रकारचे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची व्हिडिओ क्‍लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

यामध्ये प्रा. सावंत हे "माझ्याकडे इतके पैसे आहेत, की मी अख्ख्या महाराष्ट्राला भिकारी बनवेन,' असे वादग्रस्त वक्तव्य करीत असल्याचे आढळून येत आहे. परिचारकांवरून वातावरण तापलेले असताना प्रा. सावंत यांची प्रचारावेळची तो व्हिडिओ आता नेमका पुढे आला आहे. त्यामुळे प्रा. सावंत यांच्या वक्तव्याचा मुद्दा विरोधकांनी ऐरणीवर आणला, तर शिवसेना नेमकी कोणती भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

प्रा. सावंत हे यवतमाळ स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आले आहेत. शिक्षणसम्राट असलेल्या प्रा. सावंत यांच्या पुण्यात मोठमोठ्या शैक्षणिक संस्था आहेत.