शिवसेनेच्या "त्या' मंत्र्यांची खुर्ची तूर्तास कायम 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

मुंबई - आमदारांच्या नाराजीमुळे मागील दारातून विधिमंडळात येऊन मंत्री झालेल्या शिवसेनेच्या नेत्यांची खुर्ची जाण्याची शक्‍यता सध्या मावळली आहे. "तुमच्या भावनांशी सहमत आहे; मात्र तूर्तास मंत्रिमंडळात बदल होणार नाही, असे सांगत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मंत्र्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या पक्षाच्या आमदारांच्या बंडाची हवाच काढली. दरम्यान, लवकरच शिवसेनेत पक्षांतर्गत बदल होण्याची शक्‍यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

मुंबई - आमदारांच्या नाराजीमुळे मागील दारातून विधिमंडळात येऊन मंत्री झालेल्या शिवसेनेच्या नेत्यांची खुर्ची जाण्याची शक्‍यता सध्या मावळली आहे. "तुमच्या भावनांशी सहमत आहे; मात्र तूर्तास मंत्रिमंडळात बदल होणार नाही, असे सांगत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मंत्र्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या पक्षाच्या आमदारांच्या बंडाची हवाच काढली. दरम्यान, लवकरच शिवसेनेत पक्षांतर्गत बदल होण्याची शक्‍यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

विधान परिषदेचे सदस्य असलेले शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, डॉ. दीपक सावंत यांच्याविरोधात आमदारांनी बंड पुकारले होते. हे मंत्री पक्षवाढीसाठी तसेच आमदारांच्याही काडीच्याही कामाचे नसल्याचे मत व्यक्त करत त्यांच्याऐवजी विधानसभेतील आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी मागणी या आमदारांनी केली होती. 

शिवसेनेचे मंत्री व आमदारांमध्ये सुरू असलेल्या या वादावर पडदा टाकण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी "मातोश्री'वर बैठक बोलावली होती. त्यांनी मंत्र्यांना दुसऱ्या खोलीत बसवून आमदारांशी चर्चा केली. त्या वेळीही आमदारांनी मंत्र्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर ठाकरे यांनी आमदार आणि मंत्र्यांची एकत्र बैठक घेतली. त्यातही आमदारांनी मंत्र्यांच्या कामकाजावर टीका केली. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ग्रामीण भागांत शिवसेनेचे मंत्री अपेक्षित यश मिळवू शकले नाहीत. त्यामुळे "मातोश्री'ही नाराज आहे; मात्र "तुमच्या भावनांशी मी सहमत असलो, तरी मंत्रिमंडळात बदल करण्याची ही वेळ नाही,' असे सांगत ठाकरे यांनी आमदारांच्या बंडाची हवा काढली. 

शिवसेनेचे शिष्टमंडळ पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला 
अर्थसंकल्पातील निधीवाटपात भाजपच्या आमदारांप्रमाणे वाटा मिळावा, यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात विधिमंडळातील गटनेते एकनाथ शिंदे, मुख्य प्रतोद सुनील प्रभू, आमदार प्रकाश सुर्वे, अजय चौधरी, शंभुराजे देसाई, राजेश क्षीरसागर यांचा समावेश असेल. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या मंत्र्यांनी या मुद्‌द्‌यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. 

गटनेतेपदी ऍड. परब 
विधान परिषदेतील गटनेतेपदी असलेले परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना हटवून त्यांच्या जागी ऍड. अनिल परब यांची नियुक्ती करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. ऍड. परब हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्‍वासू आणि जवळचे समजले जातात; तर रावते शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बिनीचे शिलेदार होते. मराठवाड्यात पक्ष वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे; मात्र त्यांना हटवून ठाकरे यांनी स्वत:च्या मोहऱ्याला पुढे केले आहे. 

Web Title: Shiv Sena party internal change