शिवसेनेतील नाराजांसाठी विरोधकांचा गळ! 

shivsena
shivsena

मुंबई - महापालिका निवडणुकीच्या मैदानात शिवसेनेने उतरवलेल्या उमेदवारांमुळे पक्षात प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यांच्यासाठी विरोधक गळ टाकून बसले आहेत. त्यामुळे नाराजांची समजूत काढण्याची जबाबदारी विभागप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. वेळ पडल्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही नाराजांना गोंजारणार आहेत. 

पालिकेत सत्ता मिळवण्यासाठी किमान 114 नगरसेवकांची कुमक आवश्‍यक आहे. शिवसेनेला सत्ता कायम ठेवायची झाल्यास किमान 100 नगरसेवक निवडून आणावे लागतील. मात्र, तिकीट वाटपात झालेल्या घोळामुळे पक्षात कमालीची नाराजी पसरली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या भागांत बंडखोरी झाली आहे. येथील बंडखोरांसह नाराजांकरिता विरोधकांनी गळ टाकले आहेत. अनेक नाराजांना विरोधी पक्षातील नेत्यांकडून फोन येऊ लागले आहेत. "निवडणुकीला मदत करा, तुमचे काय ते बघू', अशी व्यावहारिक बोलणी केली जात आहेत. मात्र, सध्यातरी हे नाराज गळाला लागले नसले तरी निवडणुकीचे मैदान तापल्यावर त्यांची नाराजी शिवसेनेला महागात पडू शकते. त्यामुळे या नाराजांना थांबवण्याची जबाबदारी विभागप्रमुखांवर देण्यात आली. विभागप्रमुख आज सकाळपासून या नाराजांच्या भेटी घेत आहेत, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच काही नाराज मानले नाहीत तर स्वत: उद्धव ठाकरे अशांची समजूत काढण्याची शक्‍यता आहे. 

नाराजांचा "भाव' वाढणार 
शिवसेनेतील नाराज कोणत्या भागात राहतो. तो त्याच्या नाराजीचा मतांवर किती परिणाम होऊ शकतो आदींचा अंदाज घेऊन विरोधकांकडून अशा नाराजांशी "बोलणी' केली जात आहे. नाराजांच्या उपद्रवमूल्यानुसार त्याचा "भाव' चढणार आहे. निवडणुकीचे मैदान तापू लागल्यावर हे भाव अधिक वाढू लागतील, असे बोलले जात आहे. 

शिवसेनेचेही लक्ष 
शिवसेनेच्या नाराजांवर ज्या प्रकारे विरोधकांची नजर आहे, त्याचप्रमाणे कॉंग्रेस आणि भाजपमधील नाराजांवर शिवसेनेची नजर आहे. इतर पक्षांतील नाराजांना गोंजारण्याची जबाबदारी शिवसेनेने विभागप्रमुखांसह उमेदवारांवरच सोपवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com